मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ येथे भीषण अपघात, भरधाव इनोव्हाच्या धडकेत दोन बालकांसह पाच जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील तीव्र उतारावर एका अनियंत्रित इनोव्हा कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दोन बालकांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. ही रिक्षा राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने चालली होती. अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताग्रस्त रिक्षा ही राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने राजापूर पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. सर्व गंभीर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील सखोल उपचारांसाठी त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वाटूळ उतारावरील या थरारक अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
Comments are closed.