'क्वाड' मध्ये श्वास घेणार नवीन जीवन
नोव्हेंबरात मनिला येथे बैठक : रुबिओ यांचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘क्वाड’ या संघटनेची बैठक नोव्हेंबरमध्ये फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी केली आहे. ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण चीन सागर आणि प्रशांत महासागर या भागांमधील जागतिक समतोल राखण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.
2025 मध्ये ट्रंप अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर ही संघटना पुष्कळशी निष्क्रीय अवस्थेत गेली होती. अमेरिकेने या संघटनेच्या कामकाजात विषेश स्वारस्य दाखविले नव्हते. तथापि, आता या संघटनेत पुन्हा जीव ओतण्यास तिचे सर्व सदस्य राजी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनिला येथे होणारी संभाव्य बैठक अतिशय महत्वाची ठरणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीला उपस्थित राहिल्यास अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्याशी त्यांची भेट होणे शक्य आहे.
केव्हा होणार बैठक
मनिला येथे ही बैठक 15 ते 17 नोव्हेंबरच्या कालावधीत होणार आहे. या बैठकीचे नेमके दिनांक ठरलेले नाहीत. तथापि, ती नोव्हेंबर महिन्यात होणार आहे, हे निश्चित आहे, असे प्रतिपादन रुबिओ यांनी मुंबईत केले आहे. अमेरिकेच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे. अमेरिकेने फारसे स्वारस्य न दाखविल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये या संघटनेची चारही सदस्य देशांची बैठक होऊ शकलेली नाही. ती आता होणार असल्याने स्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रुबिओ ठाम समर्थक
क्वाड या संघटनेचे रुबिओ हे ठाम समर्थक आहेत. त्यांनी प्रथम पासूनच या संघटनेच्या महत्वावर प्रकाश टाकला आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी जागतिक समीकरणे वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न मधल्या काळात केला. त्यांनी चीनशी अमेरिकेची हातमिळवणी होईल काय, याची चाचपणी केली होती. मात्र, आता त्यांनीही क्वाडच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे तत्वत: मान्य केले आहे, असे वृत्त काही जपानी वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले आहे. क्वाडच्या पुढच्या कार्यक्रमांविषयी अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी रुबिओ यांचे विधान संघटनेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने सूचक आहे, असे जागतिक तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.