नगर परिषद साखरझोपेत; रोह्याचा मॉर्निंग वॉक ट्रॅक विद्यार्थ्यांनी केला चकाचक, दीड टन कचरा गोळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रोह्यातील नदीकिनारी असलेल्या मॉर्निंग वॉक ट्रॅकवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. साखरझोपेत असलेल्या नगर परिषद प्रशासनाची वाट न पाहता सात विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी भल्यापहाटे एकत्र येऊन संपूर्ण ट्रॅक चकाचक केला. विद्यार्थ्यांनी तब्बल दीड टन कचरा गोळा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहा शहरातील नदी किनाऱ्यावरील मॉर्निंग वॉक ट्रॅकवर नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. मात्र या परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा साचल्याने अस्वच्छता वाढली होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. ही परिस्थिती पाहून सत्यम राय, आर्यन पाटील, रौनक राजभर, साहिल रोकडे, श्रेय वरंडे, सुंदरम राय आणि इब्राहिम कासकर या सात विद्यार्थ्यांनी ट्रॅकची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी एकत्र येत ट्रॅकवरील कचरा गोळा केला. त्यांनी प्लास्टिक, बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू जमा करून परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून केलेल्या या कामाचे रोहेकरांनी कौतुक केले आहे.

नागरिकांनी प्रेरणा घ्यावी
सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र मॉर्निंग वॉक ट्रॅकवर कचरा जमा झाल्याने नियमित स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ केला तरी कचरा साचू नये याची जबाबदारी नगर परिषदेहीची आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मॉर्निंग क्लब रोहाचे अध्यक्ष प्रज्योत गुरव यांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Comments are closed.