सरकारची बनवाबनवी; अनेक झाडांवर एकच आकडा, भीमाशंकरच्या जंगलात कत्तलीचे पाप लपवण्यासाठी वन खात्याचा झोल
टोरंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी कर्जतच्या साय डोंगर परिसरातील भीमाशंकरच्या जंगलात झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. त्याविरोधात विविध पक्ष व संघटना आंदोलन करीत असतानाच सरकारची बनवाबनवी चव्हाट्यावर आली आहे. तोडलेल्या अनेक झाडांवर एकच आकडा टाकल्याचा दावा वनशक्ती संघटनेने केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भीमाशंकरच्या जंगलात कत्तलीचे पाप लपवण्यासाठीच वन खात्याने हा झोल केल्याची संतप्त भावना पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
साय डोंगर व परिसरातील पोटाल खलाटी येथे सुरुवातीला 32 हजार झाडे तोडली जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र या आकड्यावरही पर्यावरणप्रेमींनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अडीच लाख झाडे तोडली जाणार असल्याची चर्चा समोर आली. आता प्रत्यक्ष वृक्षतोडीचा आकडा तीन हजारांच्या पुढे गेल्याचे सांगितले जात असताना भविष्यात हा आकडा आणखी किती वाढणार, याबाबतही अनिश्चितता कायम आहे. अनेक झाडांवर एकच नंबर टाकून सरकार कत्तलीचे पाप लपवण्याचे काम करत आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू. असा इशारा पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. कैलास मोरे यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केली पाहणी
वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज साय डोंगर परिसराला भेट देऊन तेथील वृक्षतोडीची पाहणी केली. तसेच स्थानिकांशी चर्चा करून माहितीही घेतली, कोणत्याही परिस्थितीत वनसंपदा वाचली पाहिजे. बेसुमार वृक्षतोड होऊ नये यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन टोरंट प्रकल्पाविरोधात भव्य आंदोलन करावे, असेही आवाहन आंबेडकर यांनी केले.
- साय डोंगरातील जंगलतोडीचा हिशेबच संशयाच्या भोक्यात सापडला आहे. तोडलेल्या अनेक झाडांवर एकच क्रमांक टाकला असून काहींना तर क्रमांकच नाहीत. अगदी 35 हजारांपासून अडीच लाखांपर्यंतच्या वृक्षतोडीच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- नेमकी किती झाडे तोडली, तोडलेल्या झाडांवर एकच क्रमांक कसे टाकले याची सखोल चौकशी करा, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार झाडे तोडल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असण्याची शक्यता वनशक्ती संघटनेने व्यक्त केली आहे.
- झाडांची मोजणी करताना काही ठिकाणी एकाच क्रमांकाची पुनरावृत्ती केली आहे तर काही ठिकाणी तोडलेल्या झाडांना क्रमांकच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने सरकारची बनवाबनवी उघड झाली आहे.
Comments are closed.