फॉर्म 6 मधील वादग्रस्त अट रद्द; ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा अधिकार नाही; रोहित पवारांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीच्या फॉर्म ६ मधील एसआयआर घोषणापत्राची वादग्रस्त अट अखेर रद्द केली आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “हा उशिरा सुचलेला शहाणपणा नसून जनतेच्या रेट्यामुळे निवडणूक आयोगाला घ्यावी लागलेली माघार आहे. त्यामुळे चूक मान्य केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार उरत नाही,” अशी आक्रमक मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “अखेर निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मधील SIR घोषणापत्राची वादग्रस्त अट रद्द केली. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांना न जुमानता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही अट रेटली होती. आता ती रद्द केली. हे ज्ञानेश कुमार यांना सुचलेलं उशिराचं शहाणपण नक्कीच नाही, तर जनतेच्या आणि विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे घेतलेली माघार आहे. त्यामुळं हा लोकशाहीप्रेमी जनतेचा आणि देशातील तमाम विरोधी पक्षाचा विजय आहे. एक दिवस ज्ञानेश कुमार यांनाही असंच जावं लागेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे.”

ते म्हणाले, “आता ही अट रद्द केल्यामुळे आपण केलेली चूक एक प्रकारे निवडणूक आयोगाने मान्यच केली आणि अशी चूक केली असेल, तर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार उरत नाही.”

Comments are closed.