नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट पडणार नाही.
असंतुष्ट आमदारांशी भेटीनंतर अब्दुल्ला उल्हसित
► न्यूज एजन्सी/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षातील संकट दूर होण्याचा संकेत मिळत आहे. या पक्षाच्या 24 आमदारांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात बंड केले आहे. या आमदारांनी स्वतंत्र गट बनविण्यासाठी हालचालींना प्रारंभ केला. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांची काहीकाळ कोंडी झाली. अब्दुल्ला यांनी नुकताच त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. त्यानंतर पक्षातील असंतोष उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे.
असंतुष्ट आमदारांपैकी 16 जणांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली. ज्येष्ठ आमदारांना वगळून नवख्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यामुळे या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना त्यांचे सल्लागार चुकीचा सल्ला देत आहेत. त्यामुळे, अब्दुल्ला त्यांच्या मार्गापासून भरकटले आहेत, असे आक्षेप या आमदारांनी व्यक्त केले आहेत. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार फारुख अब्दुल्ला यांनी त्यांची समजूत काढून त्यांना बंडखोरी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्यातरी हे आमदार फारशा हालचाली करणार नाहीत, असे अनुमान आहे. मात्र, भविष्यकाळात काय घडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही मागण्या लवकर निपटणार
असंतुष्ट आमदारांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांच्यापैकी काही मागण्या त्वरित मान्य केल्या जातील. इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी विलंब लागणार आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी या आमदारांसमोर स्पष्ट केले, अशी माहिती देण्यात आली आहे. भविष्यकाळात केंद्रशासित प्रदेशाचे सरकार बळकट करण्यावर भर दिला जाईल. तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यावर राज्य सरकार पूर्ण भर देईल, असे आश्वासन फारुख अब्दुल्ला यांनी दिले आहे.
राज्याचा दर्जा देण्याची मागणी
भविष्यकाळात या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोरदारपणे केंद्र सरकारकडे केली जाईल. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या अनुच्छेद 370 चे पुनरुज्जीवन करावे, अशीही मागणी केली जाईल. नॅशनल कॉन्फरन्स पक्षात कोणत्याही परिस्थितीत फूट पडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. पक्ष बळकट आणि एकसंध राहिला, तरच त्याला भवितव्य आहे, ही बाब बंडखोर आमदारांनी मान्य केली असल्याची माहिती शुक्रवारी दिली गेली.
Comments are closed.