काश्मीरमध्ये दोन संशयितांना अटक
मागील 75 दिवसांत 30 दहशतवादी साथीदारांना अटक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. ही कारवाई एका दहशतवादी मॉड्यूलच्या तपासाचा भाग आहे. हे मॉड्यूल महिलांना लक्ष्य करून फुटीरतावादी विचारसरणी आणि प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख इरशाद अहमद भट आणि शौकत अहमद रेशी अशी पटवली आहे. गेल्या 75 दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये 30 दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आता यापुढेही दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी कारवाई सुरूच राहील, असे बांदीपोरा पोलिसांनी सांगितले. तसेच प्रदेशाची सुरक्षा आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काउंटर इंटेलिजन्स काश्मीर (सीआयके) आणि स्थानिक पोलीस पथकांनी संशयित सीमापार दहशतवादी गट, ऑनलाइन कट्टरतावाद नेटवर्क आणि दहशतवादी निधीपुरवठा यांविरुद्धच्या कारवाया तीव्र केल्या आहेत. एका कारवाईत, सीआयकेने श्रीनगर, बडगाम, पुलवामा आणि अनंतनाग येथील सहा ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. बंदी घातलेली दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी (एलईटी) कथितरित्या संबंधित असलेल्या सोशल मीडिया-आधारित भरती नेटवर्कच्या संदर्भात हे शोधमोहीम राबवण्यात आली. तपास यंत्रणेने डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. सीमेपलीकडील सूत्रधार आणि स्थानिक साथीदारांशी संभाव्य संबंध निश्चित करण्यासाठी यांची तपासणी केली जात आहे. श्रीनगरमधील होकरसर आणि बडगाममधील मागम येथील प्रकरणांशी असलेल्या संबंधांचाही तपास सुरू आहे.
Comments are closed.