नेतान्याहूंची राजवट अस्ताला; आयझेनकोट होणार इस्रायलचे नवे पंतप्रधान, राष्ट्रपतींनी दिले सत्तास्थापनेचे निमंत्रण
सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे इस्रायलमध्ये निर्माण झालेली सत्ताकोंडी अखेर फुटली आहे. इस्रायलमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या याशर पार्टीचे नेते गादी आयझेनकोट हे नवे पंतप्रधान होणार आहेत. राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आयझेनकोट यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ इस्रायलचे पंतप्रधानपद भूषवणारे बेंजामिन नेतान्याहू यांची राजवट अस्ताला जाण्याची चिन्हे आहेत.
इराण आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेली इस्रायलची निवडणूक जगभर गाजली. नेतान्याहू यांच्या विरोधात देशात प्रचंड रोष होता. विरोधकांनी जोरदार घेराबंदी केली होती. त्यातच इस्रायलमधील छोटय़ा छोटय़ा अरब पक्षांनीही जोर लावला होता. मोठय़ा प्रमाणावर मतविभागणी झाली. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. इस्रायली संसदेच्या 120 जागांपैकी नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला सर्वाधिक 27 जागा मिळाल्या. तर लिकूड पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला 53 जागा मिळाल्या. बहुमतासाठी त्यांना 7 जागांची गरज आहे, तर आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे 48 जागा आहेत. इस्रायलमधील अरब अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणाऱया विविध अरब पक्षांनी मिळून पहिल्यांदाच 19 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
कोण आहेत आयझेनकोट?
आयझेनकोट हे 66 वर्षांचे असून इस्रायलचे माजी लष्करप्रमुख आहेत. ते इस्रायलच्या मिझराही समाजाचे आहेत. मितभाषी आणि प्रसिद्धीपासून दूर असलेले आयझेनकोट यांनी अवघ्या चार वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. हमासने 2023 मध्ये इस्रायलमध्ये हल्ला केल्यानंतर काही काळ ते नेतान्याहू यांच्या युद्धकालीन मंत्रिमंडळात होते, मात्र नेतान्याहू यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काही दिवसांतच ते विरोधी पक्षात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी नेतान्याहू यांच्या विरोधात जाहीर आघाडी उघडली होती.
कशाच्या आधारे निर्णय?
आयझेनकोट यांनी अरब पक्षांचा पाठिंबा घेतला तर त्यांना संसदेत बहुमताचा आकडा गाठणे आणि सरकार स्थापणे सहज शक्य आहे, मात्र आयझेनकोट यांनी अरब पक्षांशी हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. असे असतानाही अरब नेत्यांनी आयझेनकोट यांचे नाव सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींना सुचवले. त्यांच्या बाजूने सर्वाधिक शिफारशी आल्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना आमंत्रण दिले आहे.
नव्या पंतप्रधानांपुढे तीन पर्याय
अरब पक्षांना सत्तेत सोबत घेऊन बहुमतातील सरकार बसवावे.
अरब पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेऊन अल्पमतातील सरकार.
नेतान्याहू यांच्या पक्षासोबत आघाडी करून सरकार चालवणे.
Comments are closed.