गँगस्टर आफ्रिदी इथिओपियाहून भारतात आला

नवी दिल्ली : पंजाबमध्ये हत्या, खंडणी आणि गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित असलेला कुख्यात गँगस्टर गुरविंदर सिंह उर्फ अफरीदी याला अखेर भारतात आणण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. इथिओपियामध्ये लपून बसलेल्या अफरीदीला विशेष मोहिमेद्वारे ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास पंजाब पोलिसांनी पाच लाख ऊपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अफरीदीला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी सुमारे दहा महिने आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधमोहीम राबवली. या कारवाईला ‘ऑपरेशन शहीद’ असे नाव देण्यात आले होते. अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि काउंटर इंटेलिजन्सच्या विशेष पथकाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने त्याचा माग काढला. विविध देशांमध्ये त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर इथिओपियामध्ये त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अफरीदीचा डोनी बल आणि प्रभ दासूवाल टोळीशी संबंध आहे. परदेशात राहून पंजाबमधील गुन्हेगारी कारवाया, खंडणी आणि लक्ष्यित हत्यांचे नियोजन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्याविरोधात 35 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मार्च 2025 मध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे त्याने भारतातून पलायन केले. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती, तुर्किये, केनिया आणि अंगोला या देशांतून प्रवास करत तो इथिओपियात पोहोचला होता. त्याला भारतात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणांची मदत घेण्यात आली.

अफरीदीला भारतात आणल्यानंतर पंजाब पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होणार आहे. त्याच्या कथित गुन्हेगारी नेटवर्कमधील इतर सदस्य, आर्थिक व्यवहार आणि पंजाबमधील विविध हत्या प्रकरणांतील भूमिकेचा तपास केला जाणार आहे.

Comments are closed.