स्पर्धा महाराष्ट्राची, पण रेंज गोव्याची; नेमबाजीत अव्वल असलेल्या महाराष्ट्राला राज्य अजिंक्यपदासाठी घ्यावा लागला गोव्याचा आसरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेमबाजीत देशात दबदबा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट आणि गुणवत्तेच्या जोरावर अव्वल राज्याचा लौकिक… पण याच महाराष्ट्राला स्वतःची राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेण्यासाठी मात्र शेजारच्या गोव्याचा रस्ता धरावा लागला आहे. महाराष्ट्राच्या नेमबाजांनी लक्ष्यावर नेम धरायचा आणि राज्याच्या क्रीडा व्यवस्थेने मात्र पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर नेम चुकवायचा, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. 41 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा शुक्रवार, 13 नोव्हेंबरपासून गोव्यातील मांद्रे येथील यश शूटिंग हबमध्ये सुरू होत आहे.

महाराष्ट्राच्या नेमबाजांचा कस पाहणाऱया या स्पर्धेचे आयोजन राज्यात होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात स्पर्धेचे मैदान गोव्याला हलवावे लागले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील शूटिंग रेंज गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकरणासाठी बंद आहे. नियोजित वेळेत ही रेंज स्पर्धेसाठी सज्ज न झाल्याने महाराष्ट्र रायफल संघटनेवर गोव्यात स्पर्धा घेण्याची वेळ आली. महाराष्ट्र रायफल संघटनेच्या सरचिटणीस शीला कानुंगो यांनी ही माहिती दिली.

नेमबाजीसारख्या खेळात महाराष्ट्राने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असताना राज्यात सर्व प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करता येतील, अशी सक्षम सुविधा नसणे ही गंभीर बाब आहे. राज्यातील नेमबाजांना घडविण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची वस्तुस्थिती यातील अंतर या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा उघड झाले आहे. पदकांच्या अपेक्षा मोठय़ा; पण त्यासाठी आवश्यक असलेल्या मैदानांची वानवा, असा हा विरोधाभास समोर आला आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी राज्यातील किमान 20 जिह्यांमधील हजाराहून अधिक नेमबाजांनी गोव्यात हजेरी लावली आहे. रायफल, पिस्टल आणि शॉटगन अशा तीन विभागांतील एकूण दहा प्रकारांमध्ये पदकांसाठी चुरस रंगणार आहे. रायफलमध्ये 50 मीटर प्रोन, 50 मीटर थ्री पोझिशन आणि 10 मीटर एअर रायफल; पिस्टलमध्ये 50 मीटर पिस्टल, 25 मीटर सेंटर फायर, 25 मीटर स्टॅण्डर्ड, 25 मीटर पिस्टल आणि 10 मीटर पिस्टल; तर शॉटगनमध्ये ट्रप आणि स्कीट या प्रकारांचा समावेश आहे.

Comments are closed.