प्रतिबंधित जहाजांवर खलाशांना नोकरीला ठेवणाऱ्या आरपीएसएल कंपन्यांवर कारवाई करा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रतिबंधित जागांवर खलाशांना नोकरीवर ठेवणाऱ्या आरपीएसएल कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नाविक सेनेने केली आहे. यासंदर्भात नाविक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग श्याम जगन्नाथन, सतीश कोहाकडे (आयआरएस) व कॅप्टन बिपीन कुमार यांची भेट घेतली. तसेच शिवसेना नेते व खासदार अनिल देसाई यांनी निवेदनदेखील दिले आहे. यासंदर्भात दोषी कंपन्यांवर तत्काळ कारवाई करून हिंदुस्थानातील खलाशांचे संरक्षण करावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच युद्धजन्य स्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनी येथे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील तेथील जहाजांवर काही कंपन्या हिंदुस्थानातील खलाशांना नोकरीवर ठेवत आहेत. त्यामुळे संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार अनिल देसाई व शिवसेना नाविक सेनेने याची गंभीर दखल घेत डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांची भेट घेऊन या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. नाविक सेना या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाविक सेनेच्या वतीने सरचिटणीस बाळा लोकरे, संयुक्त सरचिटणीस प्रवीण घाग, उपाध्यक्ष रणजित कदम, भूषण सांगळे, चिटणीस रितेश सावंत, प्रणय सावंत, दिशांत घाग आदी उपस्थित होते.

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा

संकटाच्या वेळी या खलाशांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता असल्याचेही नाविक सेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना सांगितले. संबंधित आरपीएसएल कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. याप्रकरणी खलाशी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

Comments are closed.