शहापूर बाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात १५ संचालकांचे बंड; भाजप-शिंदे गटाला झटका
भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असलेल्या शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर बंडाचे निशाण फडकले आहे. भाजपच्या गोटातील सभापती आणि शिंदे गटाच्या गोटातील उपसभापती यांच्या न विरोधात आणलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याने सत्ताधाऱ्यांना जोर का झटका बसला आहे. १८ पैकी तब्बल १५ संचालकांनी ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांना सत्तेवरून पायउतार होण्याची वेळ 5 आली आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन, शिंदे गटाचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार गट आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक संचालक, याप्रमाणे १८ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे. या बाजार समितीमध्ये नंदलाल डोहळे हे भाजपचे असून उपसभापती शरद वेखंडे हे शिंदे गटाचे आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत बाजार समितीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप संचालकांकडून होत होता. मंजूर ठरावांची अंमलबजावणी होत नाही. जमा-खर्चाचा हिशेब वेळेवर दिला जात नाही, असा ठपका ठेवत १२ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वासाचा ठराव दाखल झाल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची एकच पळापळ उडाली होती.
अंतर्गत मतभेद अखेर चव्हाट्यावर
शहापूर बाजार समितीमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात अनेक वेळा खटके उडाले होते. मनमानी कारभारामुळे संचालकांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. १५ संचालकांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे हे अंतर्गत मतभेद अखेर चव्हाट्यावर आले. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्याने बाजार समितीतील राजकीय समीकरणे बदलली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बाजार समितीच्या १२ संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानुसार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. त्यानुसार शहापूरचे तहसील दार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मार्केट यार्ड कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या सभेला १५ संचालक उपस्थितीत होते.
विशेष सभेला उपस्थित असलेल्या सर्वच संचालकांनी सभापती नंदलाल डोहळे यांच्याविरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे डोहळे यांच्या विरोधातील ठराव १५ मतांनी मंजूर झाला. उपसभापती शरद वेखंडे यांच्याविरोधात १४ संचालकांनी मतदान केल्याने त्यांच्या विरोधातील ठरावही मंजूर झाला.
सभापती आणि उपसभापती यांच्या विरोधात संचालकांनी मांडलेले दोन्ही ठराव बहुमताने मंजूर झाले. त्यामुळे नंदलाल डोहळे आणि शरद वेखंडे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.
Comments are closed.