'आयुष्मान भारत' कार्डची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे
वैद्यकीय मदत पॅकेजेस 23 वरून 112 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी पीएमजेएवाय) सरकारी रुग्णालयांमध्ये राखीव असलेल्या वैद्यकीय पॅकेजेसची संख्या वाढवण्याची तयारी करत आहे. सध्या, आयुष्मान कार्डधारकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये 23 प्रकारचे वैद्यकीय पॅकेजेस उपलब्ध आहेत. लवकरच ही संख्या 112 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच ‘एनएचए’ने आयुष्मान कार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया पर्यायांशी संबंधित 89 अतिरिक्त उपचार पॅकेजेस निश्चित केली आहेत. या पॅकेजेसमुळे प्रस्तावित पॅकेजेसची एकूण संख्या 112 होईल. यामध्ये तीव्र अॅनिमिया, वेगाने वाढणारा उच्च रक्तदाब, तीव्र ब्राँकायटिस (श्वासनलिकेची सूज), अतिसार, आव, गॅस्ट्रोएन्टेरायटिस (पोट आणि आतड्यांची सूज), मूत्रमार्गाचे संक्रमण, किडनी स्टोनमुळे होणारी तीव्र वेदना, अचानक ताप येण्याशी संबंधित आजार आणि मधुमेहाशी संबंधित काही गुंतागुंतींवरील उपचारांचा समावेश आहे.
प्रस्तावित यादीमध्ये हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), बायोप्सी, हायड्रोसील, मूळव्याध, सिस्ट आणि लायपोमा यांवरील उपचारांचा समावेश आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथी आणि ग्लॉकोमासाठीच्या तपासणीचाही यात समावेश असल्याचे ‘एनएचए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार देण्यासाठी सरकारी रुग्णालयांना प्रतिपूर्ती दिली जाते. या रकमेचा उपयोग पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी, औषधे आणि इतर उपचार साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, कार्यान्वयन खर्च भागवण्यासाठी आणि अतिरिक्त आरोग्य व्यावसायिक नियुक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.
‘आयुष्मान भारत’मधील प्रस्तावित विस्ताराचा मुख्य भर सामान्य आजारांवर उपचार करण्यावर आहे. त्यानुसार आरोग्य केंद्रांमध्ये आता अधिक प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. लाभार्थ्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना वारंवार आवश्यक असलेल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि विद्यमान पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून आणि अतिरिक्त आर्थिक संसाधने पुरवून सरकारी रुग्णालयांना बळकट करणे, असे या निर्णयाचे दोन मुख्य उद्देश आहेत.
उपचारांसाठी आता लांबचा प्रवास टाळणार
अनेक उपचार सरकारी रुग्णालयांमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून केले जाऊ शकतात. सर्वसामान्य उपचार रुग्णांना त्यांच्या घराजवळील सरकारी रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे दिले जाऊ शकतात, त्यासाठी त्यांना लांबचा प्रवास करावा लागू नये. शिवाय, या रुग्णालयांचा वाढलेला वापर त्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यास आणि सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत करेल, असा दावा ‘एनएचए’कडून करण्यात आला आहे.
25 नोव्हेंबरपर्यंत सूचना मागवल्या
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, 2019 पासून प्रसूती आणि स्त्राrरोग तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विशेष सेवांसाठी 23 उपचार पॅकेजेस सरकारी आरोग्य केंद्रांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर, अनेक राज्यांनी त्यांच्या आरोग्यसेवा क्षमतेनुसार अतिरिक्त पॅकेजेस राखीव ठेवली. त्यात आता पुन्हा ‘एनएचए’ने राष्ट्रीय स्तरावर उपचार पॅकेजेसची व्याप्ती आणखी वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. एनएचएने 13 ऑक्टोबर रोजी एक कार्यालयीन सूचनापत्र जारी करून राज्य आरोग्य संस्थांना प्रस्तावित यादीचे पुनरावलोकन करून 25 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या सूचना सादर करण्यास सांगितले आहे. राज्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून सुधारित प्रणाली 1 डिसेंबरपासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
सध्या निवडक आजारांवर आयुष्मान कार्डद्वारे उपचार
आयुष्मान योजनेअंतर्गत, आरोग्य मंत्रालयाने विविध आरोग्य पॅकेजेस स्थापित केली आहेत, ज्यात गंभीर आणि सामान्य अशा दोन्ही आजारांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत अनेक गंभीर हृदयरोग, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांवर सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार केले जाऊ शकतात. कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांच्या उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या पर्यायांचा या योजनेत समावेश आहे. तसेच किडनी निकामी होणे, डायलिसिस आणि किडनीच्या इतर गंभीर समस्यांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत. सांधे आणि हाडांच्या गंभीर दुखापती व शस्त्रक्रियांसाठी पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत. पोट, डोळे, कान, नाक आणि घशाशी संबंधित सर्व सामान्य आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आतापर्यंतच्या पॅकेजीसमध्ये करण्यात आला होता.
…………….
Comments are closed.