शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले; सरकारचा निव्वळ नाकर्तेपणा! मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. हा निव्वळ नाकर्तेपणा आहे. ज्या शेतकऱ्यांनी या सरकारला सत्तेवर बसवले, तेच सत्ताधारी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे,’ अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जालना येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी शेतकरी, कर्जबाजारीपणा आणि आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका केली.
केंद्र आणि राज्य सरकारला मतदारांची आठवण केवळ निवडणुकीच्या काळात होते. निवडणूक संपल्यानंतर मतदारांना वाऱ्यावर सोडले जाते, असा आरोपही त्यांनी केला. कर्जासाठी गावात येणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना गावबंदी करण्यासारखी भूमिका शेतकरी आणि ग्रामस्थांनी घ्यावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. मात्र, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, तसेच अडचणीच्या काळात खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आगामी हिवाळी अधिवेशनावरही जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना लक्ष्य केले. ‘हाऊसमध्ये एकमेकांना विरोध दाखवतील आणि हाऊस संपल्यानंतर एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन बसतील. एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करतील आणि नंतर मित्रपक्षाच्या नावाखाली युती करतील,’ अशी टीका त्यांनी केली.
‘जरांगेंविरोधात बोला अन् पैसे कमवा’ गंभीर आरोप
यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट आरोप केले. ‘जरांगे पाटलांच्या विरोधात बोला आणि पैसे कमवा’, अशी नवी स्कीम फडणवीस-शिंदेंनी आणली आहे,’ असा आरोप त्यांनी केला. माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना फडणवीस-शिंदे पैसे देत असतील, असा दावाही त्यांनी केला.
Comments are closed.