रक्षिता रामराजने ऑलिम्पिक चॅम्पियनला धूळ चारली
हिंदुस्थानसाठी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आजचा दिवस आनंददायी ठरला. एकिकडे रक्षिता रामराजने ऑलिम्पिक चॅम्पियनला धूळ चारली, तर दुसरीकडे किदम्बी श्रीकांतने पिछाडीवरून पुमनारमन करत दमदार विजय साकारला. लक्ष्य सेनने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असून सात्त्विक-चिराग यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
हिंदुस्थानच्या रक्षिताने चीनच्या चेन यु फेईला सरळ गेममध्ये पराभूत करून सर्वांना धक्का दिला. कोईम्बतूरच्या या 19 वर्षीय खेळाडूने यु फेईला 21-18, 24-22 असे हरवून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक नोंदवला.
श्रीकांतला पहिल्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी त्यानंतर त्याने दणक्यात पुनरागमन केले. श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या यू ताई बिनविरुद्धच्या सामन्यात 12-21, 21-18 आणि 21-14 असा दमदार विजय साकारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरलेल्या लक्ष्यने डेन्मार्कच्या रासमुस गेम्केचा 21-11, 21-18 असा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत सात्त्विक–चिराग
हिंदुस्थानची पुरुष दुहेरीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या मानांकित या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयुब आणि टॅन वी किओंग या जोडीचा 42 मिनिटांत 21-19, 21-16 असा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला.
Comments are closed.