आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट आणि सावकारीचा पर्दाफाश करणे गुन्हा आहे का? किडनी विकावी लागलेल्या शेतकऱ्याचा सवाल, नागपूर अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिन्थुर येथील किडनी विकावी लागलेल्या शेतकऱ्याचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या रोशन कुडे यांना कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे, तर ज्या शेतजमिनीवर ते उदरनिर्वाहासाठी शेती करीत होते, त्या जमिनीवरही सावकारांनी ताबा मिळवल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात शासनाकडून आदेश होऊनही अद्याप त्यांना त्यांच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. त्यामुळे आता रोशन कुडे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट बाहेर काढणे आणि जिल्ह्यातील अवैध सावकारीचा फास आवळणे हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळाच्या आगामी नागपूर अधिवेशनादरम्यान न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रोशन कुडे हे आपल्या गावातून पत्नी, दोन मुले आणि वडिलांसह चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा देत दाखल झाले होते. मात्र, चंद्रपूरला पोहोचण्यापूर्वीच नागभीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. येथे त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर रोशन कुडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. रोशन कुडे यांच्या म्हणण्यानुसार, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. मात्र, किडनी विकूनही त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी आपण कसत असलेल्या शेतजमिनीवरही सावकारांनी ताबा मिळवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणात शासनाने जमिनीचा ताबा मिळवून देण्याबाबत आदेश दिल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात जमिनीचा ताबा मिळालेला नाही. मग शासकीय आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे स्वतःची किडनी विकण्यापर्यंत परिस्थिती का ओढवली, या प्रकरणामागे कोणते आर्थिक व्यवहार आणि सावकारीचे जाळे आहे, तसेच या प्रकरणाशी संबंधित कथित आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटची सखोल चौकशी का होत नाही, असे अनेक प्रश्न रोशन कुडे यांनी उपस्थित केले आहेत. एकीकडे अवैध सावकारीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते, तर दुसरीकडे पीडित शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार रोशन कुडे यांनी व्यक्त केला आहे. आता तरी प्रशासन या पीडित शेतकऱ्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देणार का? त्यांना त्यांच्या शेतजमिनीचा ताबा मिळणार का? आणि कथित किडनी रॅकेट व अवैध सावकारीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.