Ratnagiri News – रत्नागिरीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ; डाक विभागाची आधुनिक पार्सल सेवा सज्ज
जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हापूस आंबा, काजू, कोकम, फणस प्रक्रिया उत्पादने आणि मसाले यांसारख्या स्थानिक व घरगुती उत्पादनांना आता थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविणे अधिक सुलभ झाले आहे. भारतीय डाक विभागाने आपल्या पार्सल व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले असून, जिल्ह्यातील उद्योजक, महिला बचत गट आणि व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, आंबा-काजू बागायतदार, प्रक्रिया उद्योग, गृहउद्योग तसेच नवउद्योजकांच्या व्यवसाय विस्तारासाठी डाक विभागाने विविध व्यावसायिक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, पार्सल, बिझनेस पार्सल आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांचा समावेश आहे. व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी पार्सलचे ‘ट्रॅक अँड ट्रेस’, घरपोच ‘पिकअप’, उपलब्धतेनुसार ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) आणि ‘ऑनलाइन ग्राहक पोर्टल’ यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वाढत्या ई-कॉमर्स युगात ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला बचत गटांनाही आपली उत्पादने स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित न ठेवता देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येणार आहेत. पोस्ट ऑफिसचे सर्वदूर पसरलेले जाळे लहान व्यावसायिकांसाठी मोठा आधार ठरणार असून, यामुळे जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- रत्नागिरी तालुका: गजानन करमरकर (९४२२०१०९३०)
- संगमेश्वर तालुका: रविंद्र घडशी (९६०४५६५६४८)
- राजापूर तालुका : संजय मतकर (७८७५१६३१७६)
- लांजा तालुका : महेश साळसकर (9370749597)
Comments are closed.