Chandrapur news – 10 फुटी अजगराला काठीने बेदम मारहाण; दोन मद्यधुंद युवकांना वनविभागाने घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मद्यधुंद अवस्थेत दोन युवकांनी दहा फुटी अजगराला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील शारदा चौकात घडली. एवढेच नव्हे, तर अर्धमेला झालेल्या अजगराला हातात घेऊन या युवकांनी परिसरात संतापजनक प्रकार केला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई करत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले.

शारदा चौक परिसरात दोन युवकांनी अजगराला काठीने मारहाण केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मद्यधुंद अवस्थेतील या युवकांनी अजगराला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर अर्धमेला अजगर हातात घेऊन त्यांनी परिसरात प्रदर्शन केले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी याची माहिती हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना दिली.

संस्थेच्या सदस्यांकडून माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कारवाई करत दोन्ही युवकांना ताब्यात घेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या अजगराला पुढील उपचारासाठी मूल मार्गावरील वन्यजीव शुश्रूषा केंद्रात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी चंद्रपूर वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून, वन्यजीवाला मारहाण करणाऱ्या युवकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Comments are closed.