जॉर्जियामध्ये गॅस स्फोटानंतर पाच मजली इमारत कोसळली
सहा जणांचा मृत्यू : तीन वर्षांची चिमुरडी बचावली
वृत्तसंस्था/ त्बिलिसी
जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथील पोनिचाला उपनगरात गुऊवारी गॅस स्फोट होऊन पाच मजली निवासी इमारतीचा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत एका बालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून तीन वर्षांच्या चिमुरडीला जिवंत बाहेर काढले.
गृह मंत्री सुल्खान तमाझाशविली यांनी सहा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली. ढिगाऱ्याखाली अनेक तास अडकूनही चिमुरडी बचावली असून तिची प्रकृती स्थिर आहे. 11 वर्षांच्या मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गॅस पुरवठादार कंपनी ‘त्बिलिसी एनर्जी’च्या माहितीनुसार, स्फोटाचे संभाव्य केंद्र असलेल्या सदनिकेची नोंद रिकामी म्हणून होती. गेल्या वर्षभरात तेथे गॅसचा वापरही झाला नव्हता. दुर्घटनास्थळाची तपासणी अद्याप कंपनीला करता आलेली नाही. इमारतीचे काही भाग असुरक्षित घोषित करण्यात आले असून 28 कुटुंबांतील शंभरहून अधिक नागरिकांना तात्पुरते हॉटेलमध्ये हलविण्यात येणार आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याची फौजदारी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Comments are closed.