कापूस खरेदीत कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, बोगस वाहनांच्या आधारे CCI ची फसवणूक?
शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी, यासाठी भारतीय कापूस महामंडळ अर्थात CCI च्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी केली जाते. मात्र, याच शासकीय खरेदी प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. बोगस वाहन क्रमांक, कथित बनावट वजन पावत्या आणि बाजार समितीच्या बनावट पावत्यांच्या आधारे CCI कडून कोट्यवधी रुपयांची देयके उचलण्यात आल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कापूस वाहतुकीसाठी चक्क रुग्णवाहिका, मोटारसायकल आणि कारचे क्रमांक वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार CCI च्या बेलापूर येथील मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली होती. तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यामुळे कोरपना तालुक्यातील जिनिंगशी संबंधित संचालक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच CCI मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या कापसाच्या नावाखाली शासकीय निधीची लूट झाली का? रुग्णवाहिका आणि दुचाकींच्या क्रमांकावर प्रत्यक्षात कापसाची वाहतूक कशी दाखवण्यात आली? या कथित गैरव्यवहारात नेमके कोणाचे हात गुंतले आहेत? आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Comments are closed.