कृषी विद्यापीठांमध्ये ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांनाही शुल्क सवलत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्कांमध्ये सवलती मिळणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय आज कृषी विभागाने जारी केला.

या निर्णयानुसार मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कासह प्रवेश शुल्क, ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यार्थी सहाय्य व कल्याण निधी, विमा निधी, महाविद्यालयीन मासिक शुल्क, वैद्यकीय मदत निधी आणि विद्यार्थी ओळखपत्र शुल्क अशा विविध शुल्कांमध्ये सवलत मिळणार आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लाभ देताना शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश चारही कृषी विद्यापीठांना देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला आवश्यक समन्वय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, ही शासनाची भूमिका आहे. या निर्णयामुळे कृषी शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Comments are closed.