मुंढवा जमीन घोटाळा पार्थ पवार यांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी खासदार पार्थ पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही पार्थ यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र अशाच स्वरूपाच्या याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचे सरकारी वकिलांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली.

40 एकर शासकीय जमिनीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी याचिका केली. राजकीय वरदहस्तामुळे पुणे पोलीस पार्थ यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला असून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की, याचिकाकर्त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून अशाच स्वरूपाच्या याचिका न्यायालयाने यापूर्वी फेटाळल्या होत्या. खंडपीठाने या युक्तिवादाची दखल घेत सदर याचिका फेटाळून लावली.

Comments are closed.