कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरपुरात 5 लाख भाविक
‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ अशा संतोक्तीची प्रचीती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या लाखो वैष्णवांच्या उपस्थित भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत 5 लाख भाविक दाखल झाले आहेत. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने याचा फटका कार्तिकी वारीला बसला आहे. यामुळे भाविकांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंडय़ांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. मंदिरापासून सुमारे 4 किमी अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत 1 लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत, तर 65 एकर भक्तिसागरात 3 लाख भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तंबू, राहुटय़ांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.
चालूवर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेले, ज्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून कार्तिकी यात्रेला भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दर्शन रांग गोपाळपूरपर्यंतच पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागत आहे, तर मुखदर्शन रांगही मंदिरातील विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत पुढे सरकली आहे. यावेळी मुखदर्शनासाठीदेखील किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल तैनात
चंद्रभागेत मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. सोबतच 4 हजार 656 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, तर 335हून अधिक सीसीटीव्ही पॅमेऱयांची करडी नजर भाविकांवर असणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया वारकऱयांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.