सोन्याचे भाव त्यांच्या वर्षातील नीचांकी पातळीवर आहेत

सोने प्रतितोळा सव्वा लाखांच्या आसपास तर चांदी प्रतिकिलो पावणेदोन लाखांवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) माहितीनुसार, शुक्रवारी 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव 5,947 ने घसरून 1.23 लाखांवर आला. या घसरणीमुळे सोनेदराने जवळपास वर्षभरापूर्वीची नीचांकी पातळी गाठली आहे. गेल्यावर्षी 24 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार 308 रुपये होता. यानंतर वर्षभर त्याचे भाव उच्च पातळीवर राहिले होते. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 9,789 रुपयांची घसरण होऊन तो प्रतिकिलो 1.70 लाख रुपयांवर आला. देशात विविध शहरांमध्ये हे दर वेगवेगळे असल्यामुळे ग्राहकांना स्थानिक स्थितीनुसार ‘आयबीजीए’च्या दरांमध्ये कमी-अधिक फरक दिसून येईल.

अमेरिकन डॉलरची मजबुती आणि उच्च पातळीवर होणाऱ्या नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव आला आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमती उच्चांकावरून 30 टक्क्यांनी तर तर चांदीच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक दराने घसरल्या आहेत. चालू वर्षात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत राहिले. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याची किंमत 1.33 लाख रुपये होती. त्यानंतर 29 जानेवारी रोजी सोनेदर 1.76 लाख रुपये या उच्चांकावर पोहोचले होते. तेव्हापासून सोन्याच्या किमतीत अंदाजे 52 हजार रुपये म्हणजेच सुमारे 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. दरम्यान, चांदीची किंमत 31 डिसेंबर 2025 रोजी 2.30 लाख होती आणि 29 जानेवारी रोजी ती 3.80 लाख रुपये या उच्चांकावर पोहोचली. तेव्हापासून, चांदीच्या किमतीतही 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

विविध शहरांमधील दरातील फरकाची कारणे

वाहतूक आणि सुरक्षा : एका शहरातून दुसऱ्या शहरात सोन्याची वाहतूक करताना इंधन व सुरक्षेचा खर्च येत असल्यामुळे अंतर वाढल्याने किमती वाढतात.

खरेदीचे प्रमाण : दक्षिण भारतात जास्त खपामुळे सुमारे 40 टक्के सराफ मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, परंतु सवलती मर्यादित असतात.

स्थानिक सराफा संघटना : राज्य आणि शहर सराफ संघटना स्थानिक मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर दर निश्चित करतात.

जुना साठा व खरेदी किंमत : सराफ व्यावसायिकांनी केलेल्या खरेदी किमतीवरही विक्रीची किंमत ठरवली जात असते.

Comments are closed.