युवक काँग्रेसने मेटा कार्यालयाची तोडफोड केली

सोशल मीडिया खाती बंद केल्याने मुंबई, हैदराबाद, गुरुग्राममध्ये गोंधळ : काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेत्यांची ‘मेटा’वरील सोशल मीडिया खाती निलंबित केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने तीन शहरांतील मेटा कार्यालयांबाहेर आंदोलन केले. हैदराबादमध्ये, आंदोलकांनी मेटा कार्यालयात प्रवेश करून तोडफोड केली. हैदराबाद, मुंबई आणि गुरुग्राम येथील मेटा कार्यालयांमध्ये आंदोलन आणि तोडफोड केल्याबद्दल भारतीय युवक काँग्रेसवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी युवक काँग्रेसच्या चार नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला. दरम्यान, आंदोलनानंतर काही नेते-कार्यकर्त्यांची खाती सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेटाच्या कार्यालयासमोरच्या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले. मुंबईतील आंदोलनादरम्यान इमारतीच्या काचेवर ‘मेटा : भाजप आरएसएसचा बेटा’ असे लिहिण्यात आले. दरम्यान, गुरुग्राममध्ये आंदोलकांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. 19 नोव्हेंबर रोजी भाजपच्या सांगण्यावरून मेटाने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांची इन्स्टाग्राम खाती निलंबित केल्याचा युवक काँग्रेसचा आरोप आहे. संघटनेने मेटाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर या कालावधीत विरोधी पक्षनेते, पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्या खात्यांवरील निर्बंध न हटवल्यास देशभरातील मेटा कार्यालयांबाहेर आंदोलने केली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये 21 आंदोलक ताब्यात

तेलंगणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जक्किडी शिवचरण रे•ाr यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते शनिवारी सकाळी हैदराबादमधील मेटा कार्यालयात पोहोचले. कार्यालयाच्या कॉरिडॉर आणि कॅफेटेरियामध्ये आंदोलक असल्याचे व्हिडिओ समोर आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी 20 ते 21 आंदोलकांना ताब्यात घेतले. सुमारे तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

काँग्रेस गुंडांचा पक्ष : भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी शनिवारी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली. भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केवळ मेटाच्या कार्यालयाची तोडफोड केली नाही, तर ते सोशल मीडियावर त्याचे प्रदर्शनही करत आहेत. काँग्रेस हा गुंडांचा पक्ष असल्याचा आरोपही भंडारी यांनी केला. यापूर्वी युवक काँग्रेसने वर्ल्ड एआय समिटमध्ये अर्धनग्न अवस्थेत प्रवेश करून देशाचा कसा अपमान केला होता याची आठवणही त्यांनी करून दिली.

Comments are closed.