अयोध्या आणि जनकपूर दरम्यान थेट रेल्वे सेवा फीडबॅक पाठवा
आज दोन्ही पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा : बलेन शाह भारतात आले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळमधील जनकपूर धाम आणि उत्तर प्रदेशातील अयोध्या दरम्यान सोमवारपासून एक नवीन साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचे उद्घाटन करतील. ही रेल्वे माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर आणि भगवान श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या या रामायणाशी संबंधित स्थळांना जोडणार असल्यामुळे या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. या रेल्वेसेवेच्या माध्यमातून भारत-नेपाळ यांच्यातील सामायिक सांस्कृतिक वारसा अधिक दृढ होईल असा दावा केला जात आहे.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह रविवारी आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. आता सोमवारी ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत ऊर्जा आणि गुंतवणुकीसंबंधी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत-नेपाळ संबंधांमधील अलीकडील तणाव आणि बालेन यांची भारतविरोधी भूमिका पाहता हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
बालेन शाह यांचा भारत दौरा अंदाजे 25 तास चालेल. रविवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना नेपाळी वस्तूंची खास भेट दिली. तसेच ते महात्मा गांधींच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यासाठी राजघाटावरही पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी, 23 नोव्हेंबर रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी त्यांच्या नेपाळी समकक्षांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतील. त्यानंतर सोमवारी सायंकाळीच ते काठमांडूला परततील.
बालेन शाह यांच्या भारत भेटीमुळे दोन शेजारी देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्याची, संपर्क वाढवण्याची आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल. भारत आणि नेपाळमध्ये अनेक मुद्दे आणि करार अस्तित्वात आहेत. त्यांना सकारात्मक पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही नेते करतील. हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विकासाला गती देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विषयांसह अनेक उदयोन्मुख आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजू सहकार्याची शक्यता दोन्ही नेते पडताळून पाहू शकतात. सुधारित रस्ते आणि हवाई संपर्क, पेट्रोलियम पाईपलाईनचा विस्तार आणि गॅस पाईपलाईन जोडणीची शक्यता यावरही चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय, आर्थिक मदतीचा मुद्दाही उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अयोध्या-जनकपूर रेल्वेसेवा सुरू होणार
23 नोव्हेंबर रोजी शाह आणि मोदी अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर धाम दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वेगाडी भगवान रामाचे जन्मस्थान अयोध्या आणि नेपाळमधील देवी सीतेचे जन्मस्थान जनकपूर धाम यांना जोडेल. आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वेगाडी अयोध्या धाम, गोरखपूर, बस्ती, नरकटियागंज, रक्सौल, सीतामढी, मधुबनी आणि जयनागर मार्गे 604 किलोमीटरचे अंतर कापेल.
सांस्पृतिक परंपरांना अनुसरून भेटवस्तू
बालेन शाह पंतप्रधान मोदी यांना ‘रातो मच्छिंद्रनाथ’ यांची मूर्ती भेट देणार आहेत. रातो मच्छिंद्रनाथ हे काठमांडू खोऱ्याचे प्रमुख दैवत मानले जातात आणि नेपाळच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशात त्यांचे स्थान खोलवर रुजलेले आहे. नेपाळी लोककथेनुसार, लिच्छवी घराण्याचे शासक राजा नरेंद्र देव यांनी रातो मच्छिंद्रनाथ यांना सध्याच्या आसाममधून काठमांडू खोऱ्यात आणले होते. दुसरीकडे, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काठमांडूच्या चाबहिल येथील ऐतिहासिक चारुमती विहाराशी संबंधित एक मूर्ती भेट दिल्याचे समजते. या बौद्ध मठाचा इतिहास मौर्य सम्राट अशोक आणि त्यांची कन्या चारुमती यांच्याशी जोडलेला आहे.
Comments are closed.