पाकिस्तानी मंत्री अवाक झाले

दहशतवादी हल्ले, सिंधू पाणी करारावरील प्रश्नांच्या उत्तरांना सोयीस्कर बगल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नवी दिल्लीत आयोजित पहिल्या एससीओ सभ्यता संवादात, पाकिस्तानी मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी भारतातील दहशतवादी हल्ले आणि सिंधू पाणी कराराविषयीच्या थेट प्रश्नांना पुन्हा एकदा बगल दिली. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आणि भारतातील हल्ल्यांविरुद्ध इस्लामाबादने काय कारवाई केली? अशी विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी पुराव्याची मागणी केली. पाकिस्तानदेखील दहशतवादाने प्रभावित असून तेथील हजारो नागरिक अतिरेकी विचार आणि दहशतवादाला बळी पडत असल्याचे अनौपचारिक उत्तर त्यांनी दिले. तसेच सिंधू पाणी करारासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना भारताने चर्चेसाठी आमंत्रित केल्यासच या विषयावर चर्चा करू, असे उत्तर त्यांनी दिले.

पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कुरापती आणि तेथे कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांवरील कारवाईबद्दल विचारले असता या विषयावरील कोणतीही चर्चा पुराव्यावर आधारित असावी, असे मसूद मलिक यांनी सांगितले. दहशतवाद ही संपूर्ण प्रदेशाची एक सामायिक समस्या असल्याचे वर्णन करून, त्यावर एकत्रितपणे तोडगा काढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दहशतवादाशी संबंधित सर्व पुरावे आणि तथ्ये एकमेकांसमोर पारदर्शकपणे सादर केली पाहिजेत. हे साध्य करण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतासोबत संवादासाठी आवाहन

मलिक यांनी भारताला संवादासाठी आवाहन केले. कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा असेल आणि केवळ वाद वाढवायचा नसेल, तर  संवादाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे मलिक म्हणाले. नजिकच्या काळात या विषयावर चर्चा होईल, तेव्हा ती पुराव्यांवर आधारित असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादाविरोधात भारताची ठोस रणनीती

भारताने सीमापार दहशतवाद आणि राज्य-पुरस्कृत दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारले आहे. दहशतवादी नेटवर्क, त्यांचा निधीपुरवठा आणि ते देत असलेल्या सुरक्षित आश्रयस्थानांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत राजनैतिक स्तरावरही प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या 12 वर्षांत, भारताने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कायदेशीर चौकट, संस्थात्मक यंत्रणा आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण मजबूत केली आहे. केंद्रीय आणि राज्य यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.

Comments are closed.