देशभरात रस्ते अपघातात 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे

गुजरात, राजस्थानपासून बिहारपर्यंत अपघातांची मालिका : अनेक कुटुंबांनी प्रियजनांना गमावले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरातील विविध राज्यांमध्ये रविवारी पहाटेपासून झालेल्या भीषण रस्ते अपघातांमुळे रस्ते सुरक्षेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. काही दुर्घटनांमध्ये तीर्थयात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा बळी गेला, तर इतर प्रकरणांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे दिवसभरात 30 हून अधिक जणांचे बळी गेले.

देशाच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघाताच्या या घटनांमध्ये लहान मुले, महिला आणि तरुणांनीही आपले प्राण गमावले आहेत. या अपघातांकडे केवळ तुरळक घटना म्हणून पाहणे पुरेसे नाही. या घटनांमागे अतिवेग, चालकाचा थकवा, रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष यांसारख्या गंभीर समस्या दिसून आल्या आहेत. गुजरातमध्ये शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळी झालेल्या दोन रस्ते अपघातांत 10 जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात कच्छमध्ये झाला असून त्यात ट्रक आणि कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचे दोन तुकडे झाले. दुसरा अपघात केशोद-बालागम मार्गावर झाला. जुनागडहून माधवपूरकडे जाणारी भरधाव वेगातील स्विफ्ट कार वळणावर नियंत्रण गमावून उलटल्यानंतर तिला आग लागली. गाडीतील चारपैकी 3 जण जळून खाक झाले. गाडीची काच फुटल्यानंतर इन्फ्लुएन्सर कृष्णा चुडासमा सुदैवाने बचावल्या.

राजस्थानात ट्रकला क्रूझरची धडक, 9 ठार

राजस्थानातील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक मोठा रस्ते अपघात झाला. एका क्रूझर कारची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने एकाच कुटुंबातील 9 सदस्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य सात जण जखमी झाले. मृतांमध्ये एका 3 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंबीय खाटूश्याम मंदिरातून परत येत होते.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे बस-ट्रक टक्कर

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे राष्ट्रीय महामार्ग-2 वर एका डबल-डेकर बस आणि ट्रकची भीषण टक्कर झाली. यात चौघांचा मृत्यू झाला आणि 15 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त बस दिल्लीहून वाराणसीकडे जात होती.

बिहारमध्ये स्कॉर्पिओला धडक, 4 ठार

बिहारमधील आत्मगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावनिमा पेट्रोल पंपाजवळ एका समारंभातून परतणाऱ्या स्कॉर्पिओला अनियंत्रित ट्रकने धडक दिली. यात 4 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हरियाणात दोघांचा मृत्यू

हरियाणाच्या कर्नाल येथील मॉडेल टाऊनजवळ ज्वेल्स रोडवर दोन वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन ते चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुचाकीस्वाराला वाचवताना आंध्रात एसयूव्हीला अपघात

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यात महामार्गावर झालेल्या एका रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर जखमी झाले. एक वृद्ध दुचाकीस्वार सर्व्हिस लेनमधून महामार्ग ओलांडत असताना हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने येणाऱ्या निळ्या एसयूव्हीच्या चालकाने गाडी दुसऱ्या लेनमध्ये वळवली आणि समोरून येणाऱ्या पांढऱ्या एसयूव्हीला धडक दिली. या धडकेत आणखी एक दुचाकीस्वारही सापडला आणि रस्त्यावरून बाजूला फेकला गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातांमागील मुख्य कारणे…

वेग : महामार्गांवरील जास्त वेगामुळे अनेकदा चालकांना अचानक समोर येणारे वाहन किंवा अडथळा टाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

चालकाचा थकवा आणि झोप : जास्त अंतरासाठी सतत वाहन चालवणे हे अपघातांसाठी एक प्रमुख धोक्याचे कारण आहे. कोटा येथील अपघातात चालकाला डुलकी लागल्याचा संशय आहे.

अवजड वाहनांची उपस्थिती : रस्त्याच्या कडेला उभे असलेले ट्रक आणि अनियंत्रित अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो.

सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष : सीट बेल्ट, सुरक्षित अंतर राखणे आणि निर्धारित वेगमर्यादा यांसारख्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अपघाताचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात.

Comments are closed.