तेल आणि वायू क्षेत्रातील 7 ब्लॉक्सबाबत मोठा निर्णय
कंत्राट 30 वर्षांपर्यंत वाढवता येणार : सरकारचा नफ्यातील वाटाही वाढणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 7 ब्लॉकच्या उत्पादन-वाटप कराराच्या मुदतवाढ धोरणात सुधारणा केली आहे. नव्या धोरणानुसार संबंधित तेल आणि गॅस क्षेत्राचे आर्थिक उत्पादन सुरू ठेवणे शक्य असेपर्यंत कंत्राटची मुदत वाढवता येणार आहे. मात्र, यासाठी संबंधित कंपन्यांना सरकारला नफ्यातील अधिक वाटा द्यावा लागणार असून, गुंतवणूक आणि उत्पादनाची उद्दिष्टेही पूर्ण करावी लागणार आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुधारित धोरण जारी केले असून यानुसार कंत्राटाची मुदत प्रत्येकी 30 वर्षांच्या एक किंवा अधिक टप्प्यांत वाढवता येईल. राजस्थान, आसाम आणि गुजरातमधील 7 तेल आणि गॅस ब्लॉक या धोरणाच्या कक्षेत येतात.
सरकारचा नफ्यातील वाटा वाढणार
नव्या धोरणानुसार कंत्राटाच्या वाढीव कालावधीत सरकारला मिळणाऱ्या नफ्यातील वाट्यात वाढ करण्यात आली आहे.
-पहिल्या 10 वर्षांसाठी सरकारला अतिरिक्त 10 टक्के वाटा मिळेल.
-पुढील 10 वर्षांसाठी सरकारला अतिक्ति 5 टक्के वाटा मिळेल.
-त्यानंतरच्या 10 वर्षांसाठी अतिरिक्त 2.5 टक्के वाटा मिळेल.
-वाढ सध्याच्या उत्पादन-वाटप करारातील सरकारी हिस्स्याच्या तुलनेत.
-राजस्थान, आसाम आणि गुजरातमधील 7 ब्लॉकचा समावेश.
या धोरणात पुढील 7 ब्लॉकचा समावेश आहे…
राजस्थान: RJ-ON-90/1 आणि SGL (RJ-ON/6)
आसाम आणि मिझोराम: DIROC AAP-ON-914/1, AA-ONJ/2
गुजरात: तारापूर (CB-ON/2), पालेज-प्रमोदा (CB-ON/7) आणि CB-ON/3.
कंपन्यांसाठी कठोर अटी
कंत्राटाची मुदत वाढवण्यासाठी कंपन्यांना मागील 10 वर्षांतील कामगिरी समाधानकारक असल्याचे सिद्ध करावे लागेल. मंजूर विकास आराखड्यातील कामन 70 टक्के विहिरींचे खोदकाम पूर्ण करणे किंवा निर्धारित उत्पादन उद्दिष्टांपैकी किमान 70 टक्के उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक असेल. याशिवाय शिल्लक तेल आणि गॅससाठ्यांचे स्वतंत्र ऑडिट, नवीन विकास आराखडा, तांत्रिक क्षमता आणि सरकारी थकबाकीची पूर्तता करावी लागेल.
मुदतवाढीसाठी अर्ज कधी करावा?
कंपन्या मूळ किंवा वाढीव कंत्राटाचा निम्मा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतील. मात्र, कंत्राट संपण्याच्या किमान दोन वर्षे आधी अर्ज करणे बंधनकारक असेल. डीजीएच 6 महिन्यांत शिफार करेल, तर त्यानंतर केंद्र सरकारतीन महिन्यांत निर्णय घेईल.
अटी पूर्ण न केल्यास पुन्हा लिलाव
संबंधित कंपन्यांनी आवश्यक अटी पूर्ण न केल्यास सरकारला संबंधित तेल आणि गॅस ब्लॉकचा नव्याने लिलाव करण्याचा अधिकार असेल. तसेच हे ब्लॉक ओएनजीसी किंवा ऑइल इंडिया लिमिटेड यासारख्या सरकारी कंपन्यांकडे सोपवण्याचाही पर्याय खुला राहिल.
Comments are closed.