एफआयआरपासून आरोपपत्रापर्यंतच्या प्रक्रियेला एआयची जोड, पोलिसांसाठी ‘तपास सारथी’ प्रणाली देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पोलिसांसाठी डिजिटल सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून गुन्हे प्रतिबंध, तपास आणि दोषसिद्धीची प्रक्रिया अधिक गतिमान व प्रभावी करण्यात येणार आहे. तपासातील त्रुटी दूर करून दोषसिद्धीचा दर वाढविण्यासाठी एफआयआरपासून आरोपपत्रापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एआयच्या माध्यमातून जोडणारी ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अँटी नार्कोटिक व्हॅन
देशातील पहिली अँटी नार्कोटिक व्हॅन अमली पदार्थांविरोधातील कारवाईसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारवाईदरम्यान पंचनामे, छायाचित्रण, व्हिडीओ चित्रीकरण आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया व्हॅनमध्येच पारदर्शक पद्धतीने होणार असून, पुरावे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्रुटी शोधण्यासाठी तपास सारथीची मदत
राज्यातील तपास प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया आणि पुराव्यांचे व्यवस्थापन एकाच प्रणालीत आणण्याचा यामागील उद्देश आहे. न्यायालयांचे पूर्वीचे निकाल, पुराव्यांचे मूल्यमापन आणि तपासातील त्रुटींचा अभ्यास करून आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच संभाव्य कमतरता शोधता येतील. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र पोलीस देशात पहिल्या-दुसऱया क्रमांकावर असला तरी सत्र न्यायालयांमधील दोषसिद्धीचा दर अधिक वाढविण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.
बोगस पोलीस ओळखता येणार
पोलिसांना देण्यात आलेले डिजिटल ओळखपत्र हे अधिकारी व कर्मचाऱयांची डिजिटल ओळख ठरणार आहे. कार्ड स्कॅन केल्यानंतर संबंधित पोलिसाची माहिती मिळू शकेल. त्यामुळे तो खरा पोलीस अधिकारी आहे की बनावट हे नागरिकांना पडताळता येईल असे त्यांनी सांगितले.
Comments are closed.