गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हलला मुभा
गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. येथे पंधरा हजार चौरस मीटर जागेत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी अग्निशमन दल व वीज विभागाची एनओसी घ्या, असेही न्यायालयाने आयोजकांना सांगितले आहे. 13 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे.
प्रभू येशू जन्मोत्सव या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गिरगाव चौपाटीवर या कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी गेली पाच वर्षे ही संस्था न्यायालयात अर्ज करत आहे. या वर्षी न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
याआधी न्यायालयाने या कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली आहे. यंदादेखील या कार्यक्रमाला परवानगी दिली जात आहे. येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे न्यायालयाने आयोजकांना सांगितले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यावसायिक जाहिराती लावू नका. पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. या कार्यक्रमाला येणाऱयांच्या सुरक्षेसाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाजगी सुरक्षारक्षक नेमा, असे आदेशही न्यायालयाने आयोजकांना दिले आहेत.
कार्यक्रमाचे फोटो काढून ठेवा
जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिसांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे. कार्यक्रमाचे फोटो काढून ठेवावेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
Comments are closed.