सुधारणा होत नसेल तर थेट परवानेच रद्द, एफडीएचा इशारा; प्रोटीन पावडर विक्रेत्यांवरही कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) नियमांचे उल्लंघन करणाऱया व्यावसायिकांवर कठोर कारवाई करूनही सुधारणा होत नसेल, तर यापुढे संबंधित व्यावसायिक आणि आस्थापनांचे केवळ परवाने निलंबित न करता थेट रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर मुंढे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंढे म्हणाले, अनेक जिममध्ये प्रशिक्षक आणि कर्मचारी तरुणांना स्नायू झटपट वाढविण्याचे आमिष दाखवून प्रोटीन पावडरची विक्री करतात. मात्र, अशा उत्पादनांना वैद्यकीय फायदे असल्याचा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार उत्पादक किंवा विक्रेत्यांना नाही. एफएसएसएआयचा परवाना असूनही चुकीचे आणि दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱयांवर कारवाई केली जात आहे. उत्पादनाच्या दर्जाची जबाबदारी उत्पादकाबरोबरच घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचीही आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱया जाहिराती करणाऱयांवरही कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

‘हिंदू केअर’ला दणका

औषधांमधील अनियमिततेप्रकरणी ‘हिंदू केअर’ कंपनीचे आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथिक औषधांचे परवाने चौकशीनंतर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे कंपनीचे कामकाज बंद झाले होते. मात्र, कंपनीने अपिलेट ऑथॉरिटीकडून स्थगिती मिळवून पुन्हा काम सुरू केले. आता या प्रकरणात नवीन घटना समोर आल्याने कंपनीवर पुन्हा कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

आता 14 दिवसांत तपासणी अहवाल

हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईनंतर प्रयोगशाळेचा अहवाल मिळण्यासाठी यापूर्वी 30 दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंत कालावधी लागत होता. मात्र, प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे, आधुनिक उपकरणे आणि मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शिफ्टमध्ये काम सुरू केल्याने आता साधारण 10 ते 14 दिवसांत अहवाल मिळत आहेत. हा कालावधी आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

Comments are closed.