शेतजमीन तीन वर्षे पडीक ठेवल्यास सरकारजमा करणार, महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा
शेतजमीन तीन वर्षे पडीक ठेवल्यास सरकारजमा केली जाईल असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
शेतजमीन सलग तीन वर्षांहून अधिक काळ पडीक ठेवल्यास ती ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात आहे. त्या तरतुदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी नागपूरच्या कोराडी येथे बोलताना दिली.
यंदा पाऊस कमी असल्याने पेरणी कमी झाली आहे, पण पुढील काळात पाऊस समाधानकारक असेल तर शेतकऱयांनी जमिनी पडीक ठेवू नयेत, असे बावनकुळे म्हणाले. अनेक मोठय़ा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 100 एकरपेक्षा जास्त जमिनी विकत घेऊन तशाच पडीक ठेवल्या आहेत, असे सांगतानाच, पाऊस असतानाही अशा सुपीक जमिनी पडीक ठेवणे नियमबाह्य आहे असे बावनकुळे म्हणाले.
व्यापाऱ्यांनी नियमबाह्य बनवल्या लँड बँक
पैसा आहे म्हणून तो जमिनींमध्ये गुंतवला जात आहे. व्यापाऱयांकडून अशा लँड बँक बनवल्या जात आहेत. हा एक प्रकारचा व्यवसायच बनला आहे. जमीन खरेदी करायची आणि काही वर्षांनी मोठय़ा भावात विकायची असे प्रकार समोर आले आहेत. तीन वर्षे कोणतीही जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली नाही तर ती सरकारला ताब्यात घ्यावी लागेल असे बावनकुळे म्हणाले.
कोकणवासीयांना सर्वाधिक फटका बसणार
कोकणात शेती करण्यासाठी मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांना भरमसाट मजुरी द्यावी लागते, त्यामुळे चांगला पाऊस झाला तरी अनेकांच्या जमिनीत शेतीच केली जात नाही. पडीक शेतजमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तर त्याचा सर्वाधिक फटका कोकणवासीयांना बसणार आहे.
Comments are closed.