शिवसेनेच्या दणक्यानंतर बोरिवलीच्या शाळेचा परिसर झाला स्वच्छ; बिल्डरने धोकादायक साहित्य, उपकरणे हटवली
बोरिवलीतील आयसी कॉलनी येथील मंडपेश्वर मुंबई पब्लिक स्कूलच्या आवारात बिल्डरकडून बांधकाम साहित्य आणि उपकरणे ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. शाळेच्या आवारात ठेवलेल्या या धोकादायक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेनेने या गंभीर प्रकाराचा भंडाफोड करत जोरदार आवाज उठवला आणि बिल्डरवर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर आज शाळेच्या आवाराचा अनधिकृत वापर बिल्डरकडून थांबवण्यात आला. बांधकाम साहित्य हटवून शाळेचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.
मंडपेश्वर मुंबई पब्लिक स्कूलच्या आवारात बिल्डरकडून गॅस सिलिंडर, बांधकाम साहित्य, स्टील कटिंग उपकरणे, वाळू तसेच आरएमसी काँक्रीट उतरवण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यानंतर शिवसेनेने शाळेची पाहणी केली होती. यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, नगरसेविका सारिका झोरे, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, अमरावती जिल्हा संपर्क संघटक युगा राऊत, विधानसभा संघटक अवधूत जाधव, युवासेनेचे जितेन परमार, मेहक सुरती, धनश्री चव्हाण, सनी पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या शाळेच्या परिसरात अशा प्रकारे बांधकाम साहित्य आणि धोकादायक उपकरणे ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती.
परवानगी कोणी दिली, चौकशी करा – आदित्य ठाकरे यांची मागणी
बोरिवलीच्या मंडपेश्वर मुंबई पब्लिक स्कूलच्या आवारात बिल्डरने ठेवलेल्या धोकादायक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. बिल्डरकडून पालिका शाळेचा असा गैरवापर होत असल्याविरोधात शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून आवाज उठवला होता. रविवारी शिवसेनेच्या दणक्यानंतर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य बिल्डरने हटवून जागा मोकळी केली आहे. बिल्डरला शाळेच्या आवारात बांधकाम साहित्य ठेवायला परवानगी कोणी दिली, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Comments are closed.