कुर्ल्यात जोडप्याला मारहाण करणाऱ्या सहा जणांची बालसुधारगृहात रवानगी
कुर्ल्यातील एका उद्यानात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करत सहा हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील २१ वर्षीय तरुण त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नवी मुंबईत आला होता. ते दोघे कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये गेले होते. खरेदीनंतर ते जवळच्या प्रमोद महाजन उद्यानात गेले. तेथे छायाचित्रे काढत असताना काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. दरम्यान, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी तिलाही मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी त्याची दखल घेत जोडप्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर मुलांची ओळख पटवून सहा मुलांना ताब्यात घेतले.
पुढील तपास सुरू
जखमी झालेल्या जोडप्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी जोडप्याचा आणि मुलांच्या गटाचा यापूर्वी काही वाद झाला होता का, तसेच मारहाणीमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.