मुंबईकरांना कोयनेचे पाणी! सरकारचा प्रस्ताव, समुद्रात जाणारे पाणी वळवणार; 67 टीएमसी जलसाठा उपलब्ध होणार
मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची गरज वाढत आहे. ती भागवण्यासाठी कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे सुमारे 67 टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव एका उच्चस्तरीय बैठकीत मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन तो प्रत्यक्षात आला तर मुंबईला हा अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर पोफळी येथून वाशिष्ठाr नदीत पाणी सोडले जाते. त्याचा वापर नदीकाठचे ग्रामस्थ शेतीसाठी करतात. तसेच चिपळूण शहर, नदीकाठची गावे आणि लोटे परशुराम, खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतींसाठीही हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. ते पाणी मुंबईकडे वळवल्यास वाशिष्ठी नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर, शेतीवर आणि मत्स्यव्यवसायावर काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास करावा लागणार
आहे.
मुंबईची तहान भागवताना उर्वरित कोकणात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही ना यादृष्टीनेही सर्वांचे मत जाणून घेण्याचे तसेच स्थानिकांनाही विश्वासात घेण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाचाही विचार
कोयनेचे पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी वापरण्याचा पर्यायही सरकारसमोर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि दुष्काळी पट्टय़ांमध्ये कृष्णा-कोयना उपसा सिंचन, ताकारी, टेंभू आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरणासारख्या योजनांच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचे प्रयत्न यापूर्वीपासून सुरू आहेत, मात्र कोयना प्रकल्पातून वाशिष्ठाr नदीत सोडले जाणारे पाणी सह्याद्रीचा घाट ओलांडून पूर्वेकडे नेणे ही मोठी खर्चिक बाब आहे. मराठवाडय़ाला पाणी देण्यासाठी तर आंतरखोरे पाणीवाटप, मोठय़ा पंपिंग योजना, जलवाहिन्या, ऊर्जा खर्च आणि कायदेशीर पाणीवाटपाच्या मर्यादा यांचा विचार करावा लागेल. त्यामुळे या पर्यायावर स्वतंत्र तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास आवश्यक आहे.
40 हजार कोटी लागणार
कोयनेचे पाणी मुंबईपर्यंत आणण्यासाठी मोठे भुयारी बोगदे, पाइपलाइन व इतर पायाभूत सुविधा लागतील. त्यासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरेल का याचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
Comments are closed.