मराठवाडय़ाची होरपळ धरणांनी तळ गाठला! ऐन हिवाळय़ात दुष्काळाची गिधाडे फडफडू लागली, 20 टँकरने पाणीपुरवठा सुरू

दरवर्षीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे राज्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. दुष्काळाची गिधाडे फडफडू लागली आहेत. मराठवाडय़ातील चित्र जास्त भीषण आहे. येथील धरणातील पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणावर घटला असून पाणीटंचाईमुळे ऐन हिवाळ्यात जनतेची होरपळ सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली आहे. सध्या मराठवाडय़ात 720 टँकरने पाणी पुरवले जात आहे.

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे महिने अपवाद वगळता कोरडे गेले. जो काही पाऊस पडला तो ठराविक दिवसांतच पडला. त्यामुळे पावसाळा संपताच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पावसाअभावी खरिपाची पिके हातची गेली आहेत. जमिनीत ओल नसल्याने रब्बी पेरणीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सरासरी 15 टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पेरलेलेही उगवून येईल की नाही, याबाबतही शेतकरी साशंक आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत असतानाच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध नसल्याने गुराढोरांना जगवायचे कसे या चिंतेत शेतकरी आहेत.

458 गावे आणि 284 वाडय़ांमध्ये टँकर

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशीव या चार जिह्यांसह विभागातील 458 गावे आणि 284 वाडय़ांतील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात सध्या 720 टँकर सुरू आहेत. यासाठी 1 हजार 252 खासगी विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

दुष्काळाची भीषण परिस्थिती, बळीराजा संकटात

निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाडय़ात यावर्षी दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, बळीराजा संकटात सापडला आहे. शासनाकडून तोडकी मदत मिळाली असून, ठोस उपाययोजनेची गरज आहे. अनेक वर्षापासून अनुदान, पिकविमा प्रलंबित असून, कर्जमाफीचा लाभ अनेकांपर्यंत पोहचला नाही. पाणीटंचाईबरोबर जनावरांना चारा, मुलांचे शिक्षण, लग्न असे अनेक प्रश्न शेततकऱ्यांना चिंतेत पाडणारे आहे. – अंबादास दानवे, शिवसेना नेते-आमदार

धरणांत उरले 51 टक्के पाणी

मराठवाडय़ातील मोठय़ा धरणांत केवळ 51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाडय़ात 11 मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नांदेड जिह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक 59.97 टक्के पाणी आहे. लातूर जिह्यातील मांजरा प्रकल्प कोरडाठाक झाल्यात जमा आहे. येथे केवळ 4.89 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडी प्रकल्पात 58.74 टक्के, माजलगाव 19.62 टक्के, सिद्धेश्वर 15.66 टक्के, येलदरी- 54.98 टक्के, निम्न दुधना 12.13 टक्के आणि निम्न मनार प्रकल्पात 17.81 टक्के पाणी उपलब्ध आहे. विभागातील 76 मध्यम प्रकल्पांत केवळ 17 टक्के आणि लघु प्रकल्पात फक्त 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सध्या शेतकरी भीषण दुष्काळाला सामोरे जात आहेत.  खरीप पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे, फळबागा पाण्याअभावी जळून चालल्या आहेत व चाराटंचाईमुळे गाय, बैल  इतर पशुधनाची शेतकरी विक्री करत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढतील. – दिनेश काकडे, प्रगतशील शेतकरी, सारंगपूर, अंबड

Comments are closed.