सत्ताधारी-विरोधक एकत्र… आयझेनकोट यांचे नेतान्याहूंना चर्चेचे आमंत्रण, इस्रायलमध्ये अजब सरकार येणार!
त्रिशंकू निकालामुळे इस्रायलमध्ये निर्माण झालेली सत्ताकोंडी लवकरच फुटणार आहे. इस्रायलमधील मावळते सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांमध्येच सत्तेसाठी युती होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रपतींनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलेले याशर पक्षाचे नेते गादी आयझेनकोट यांनी मावळते पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युतीच्या चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. रविवारपासून ही चर्चा सुरू झाली असून या अजब राजकारणाची चर्चा जगभरात रंगली आहे.
इस्रायलच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. सत्तेच्या चाव्या अरब पक्षांच्या हातात आहेत. या पक्षांनी नेतान्याहू यांना विरोध करत आयझेनकोट यांना पाठिंबा देऊ केला आहे, मात्र इस्रायलचे संपूर्ण राजकारण हे अरब विरोधावर आधारलेले असल्याने याशर पक्षातच यावर मतभेद आहेत. त्यामुळे आयझेनकोट हेही अरब पक्षांचा पाठिंबा घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. यावर तोडगा म्हणून त्यांनी पक्षांतर्गत समिती स्थापन करून लिकूड पक्षाशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
पक्ष चालेल, नेतान्याहू नको
आयझेनकोट यांनी लिकूड पक्षासोबत सरकार स्थापण्याचे संकेत दिले आहेत. मात्र ज्यांच्या विरोधात प्रचार केला, ज्यांच्यावर आरोप केले त्या नेतन्याहू यांना पंतप्रधानपद देण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. तसे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
लिकूड पक्षाच्याही अटी
इस्रायल हा ज्यू लोकांचा देश आहे हे मान्य करणे, पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता न देणे, सीरिया, लेबनॉन आणि गाझामध्ये इस्रायलची ‘सुरक्षा क्षेत्रे’ कायम ठेवणे तसेच सनातनी ज्यू नागरिकांचा लष्करी सेवेतील भरतीचा प्रश्न सोडवणे अशा अटी लिकूड पक्षाने घातल्या आहेत.
Comments are closed.