अमेरिकेत 20 महिन्यांत 6 हजार हिंदुस्थानींना अटक; 5235 जण डिपोर्टेशन सेंटरमध्ये, तर 2349 हद्दपार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन कारवाईचा फटका हिंदुस्थानींना बसत आहे. अमेरिकन कम्युनिटी मीडियाच्या अहवालानुसार, जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026 दरम्यान इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (आइस) 6111 हिंदुस्थानींना अटक केली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींच्या  अटकेचा हा विक्रम आहे. त्यापैकी 5235 जणांना डिपोर्टेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले, तर 2349 जणांना देशातून हद्दपार करण्यात आले.

स्टॉप एएपीआय हेट या संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, आशिया-पॅसिफिक समूहामध्ये हिंदुस्थानींच्या अटका, नजरकैद आणि हद्दपारीचे प्रमाण सर्वाधिक होते. आइसने दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिस्पॅनिक आणि कृष्णवर्णीय लोकांवरही कारवाई केली. कॅलिफोर्नियात आयसीईने 850 हून अधिक हिंदुस्थानींना अटक केली आहे. एएपीआयच्या मते, डेमोक्रॅटिक राज्य असलेल्या कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो, बेकर्सफिल्ड, स्टॉक्टन आणि सॅन बर्नार्डिनो येथे सर्वाधिक कारवाई झाली.

इमिग्रेशन एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानुसार, बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाई आणि हद्दपारी, दोन्हींची संख्या वाढली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हद्दपार करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या विक्रमी ठरणार आहे.

2025 मध्ये 3,567 हिंदुस्थानी अमेरिकेतून हद्दपार

2025 मध्ये अमेरिकेने 3,567 हिंदुस्थानी नागरिकांना देशाबाहेर पाठवले होते. ही माहिती हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून 2026 मध्ये दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 2026 मध्ये जूनपर्यंत 1,076 हिंदुस्थानींना देशाबाहेर पाठवण्यात आले आहे. 5 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेने पहिल्यांदा लष्करी विमानाने 104 हिंदुस्थानींना अमृतसरला पाठवले होते. यावेळी अनेकांना हातकडय़ा आणि पायात बेडय़ा ठोकण्यात आल्या होत्या. त्याची छात्राचित्रे व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित

देश             अंदाजे अवैध  स्थलांतरित

मेक्सिको 43 दशलक्ष

ग्वाटेमाला   8.5 लाख

एल साल्वाडोर 8.5 लाख

होंडुरास 7.75 लाख

हिंदुस्थान    6.8 लाख

व्हेनेझुएला 6.5 लाख

Comments are closed.