मॅनहोलची झाकणे बदलण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च! दोन वर्षांसाठी 1.10 कोटींचे नवे कंत्राट, आधीच्या कामातील 180 पैकी 142 चौरस मीटरचे काम पूर्ण
मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोलची तुटलेली आणि गायब झालेली झाकणे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात उघडय़ा मॅनहोलमुळे अपघात होण्याची भीती असताना, आता पावसाळा सरल्यानंतर ही झाकणे बदलण्यासाठी महापालिकेला पुन्हा नव्याने कंत्राट काढावे लागत आहे. ‘ए’ ते ‘जी/उत्तर’ विभागातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोलची झाकणे बदलण्यासाठी तब्बल 1 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आधीच्या कंत्राटातील 180 चौरस मीटरपैकी 142 चौरस मीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 38 चौरस मीटर काम शिल्लक आहे. त्यामुळे मॅनहोलच्या झाकणांचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
या विभागांतील अनेक मॅनहोलची झाकणे तुटली आहेत किंवा गायब झाली आहेत. काही ठिकाणी मॅनहोलच्या फ्रेम सुस्थितीत असल्या तरी झाकणांचे आकार प्रमाणित नसल्याने नवीन झाकणे बसविण्यात अडचणी येतात. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर मोजमाप घेऊन त्यानुसार एमएसची आयताकृती झाकणे तयार करून बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही झाकणे साखळी आणि कुलूपबंद यंत्रणेसह बसविण्यात येणार आहेत.
या कामासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही निविदेला केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी मे. बेलटेक इंजिनीअर्स यांनी अंदाजित खर्चापेक्षा 12.65 टक्के कमी दराने निविदा भरली आहे. या कंपनीची कंत्राटदार म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पुढील 24 महिन्यांत 400 चौरस मीटर क्षेत्रातील झाकणे बदलण्याचे नियोजन आहे. सदरील कामाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने 50 लाख रुपयांपर्यंतच्या कामाला आधीच मंजुरी दिली असून, उर्वरित पंत्राटासाठी स्थायी समितीची मंजुरी मागण्यात आली आहे.
Comments are closed.