Beed News – वर्षभरातून एकदाच महिलांसाठी उघडतात कार्तिक स्वामीचे मंदिराचे दरवाजे!
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामींचे प्राचीन मंदिर हे राज्यातील आद्य मंदिर मानले जाते. बीडपासून ५० किलोमीटर अंतरावर आणि कल्याण–विशाखापट्टणम महामार्गावर वसलेले हे मंदिर सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे असून, अश्वलिंग संस्थानचे गंगाभारती महाराज यांनी ते बांधल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील पर्वती (पुणे), नाशिक आणि पिंपळवंडी या केवळ तीन प्राचीन कार्तिक स्वामी मंदिरांपैकी हे एक आहे. येथे कार्तिक स्वामींची मयुरावर आरूढ असलेली सहा मुखांची (षण्मुख) मूर्ती आहे. प्राचीन दोन फुटी पाषाण मूर्तीची झीज झाल्याने संस्थानतर्फे चार फुटी नवीन सहा मुखी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सध्या या दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी आहेत.
येथील मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ एकदाच, कार्तिक स्वामींच्या जन्मसोहळ्यानिमित्त म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला महिलांसाठी खुले केले जातात. यंदा मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत महिला भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी दरवर्षी मराठवाड्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने महिला भाविक पिंपळवंडी येथे येतात. कार्तिक स्वामी हे संन्यस्त वृत्तीचे असल्याने महिलांना दर्शन दिले जात नसे; मात्र माता पार्वतीने जन्मदिनी तरी महिलांना दर्शन देण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनी ती परवानगी दिल्याची आख्यायिका प्रचलित आहे.
बल, बुद्धी आणि साहसाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी कार्तिकी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात; त्यामध्ये नाथषष्ठीला कार्तिक स्वामींची पालखी पैठणला नेण्याची परंपरा असून, चैत्र महिन्यात शिव-सती विवाहाच्या तिथीलाही मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र, महिलांसाठी वर्षातून केवळ एकदाच मिळणारा हा दर्शनसोहळा पिंपळवंडी मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरला आहे.
Comments are closed.