Ratnagiri News – महामार्ग की मृत्यूचा सापळा? मुंबई-गोवा महामार्गावर ठेकेदाराची मनमानी सुरूच

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा मार्ग की ठेकेदाराच्या मनमानीचा प्रयोगशाळेतील रस्ता? सध्या महामार्गावरील परिस्थिती पाहता हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. कधी अचानक रस्ता बंद, कधी एकेरी वाहतूक, कधी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेट्स, तर कधी कोणतीही पूर्वसूचना न देता मातीचे ढीग उभे केले जातात. ठेकेदाराच्या सोयीने वाहतूक व्यवस्था बदलायची आणि प्रवाशांनी जीव मुठीत धरून मार्ग काढायचा, असा संतापजनक प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.

विशेषतः सोनवी पुलावरील अनियोजित डायव्हर्जनमुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. अचानक बदललेला मार्ग, अपूर्ण जोडरस्ते आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालक अक्षरशः संभ्रमात पडत आहेत. रात्रीच्या वेळी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी ठेकेदाराच्या कामाचा अंदाज घ्यायचा की समोरून येणाऱ्या वाहनांपासून स्वतःचा बचाव करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरवली ते बावनदी हा पट्टा आधीच अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडलेले, जोडरस्ते अपूर्ण आणि वाहतूक व्यवस्थेचा कोणताही ठोस ताळमेळ नाही. त्यातच ठेकेदाराच्या सोयीनुसार होणारे अचानक बदल म्हणजे अपघातांना निमंत्रणच असते.

काम सुरू असताना सुरक्षित वाहतुकीचे नियोजन करणे, योग्य ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, दिशादर्शक फलक उभारणे आणि पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी कोणाची? ठेकेदाराला वाटेल तेव्हा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणी दिला? महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करतात की केवळ कार्यालयात बसून कामाचा अहवाल तपासतात? असे अनेक बोचरे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

दुर्दैवाची बाब म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाही लोकप्रतिनिधींची ठोस भूमिका कुठे दिसत नाही, अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. जनतेने मतदान करून निवडून दिलेले प्रतिनिधी या महामार्गावरून प्रवास करीत नाहीत का? की सर्वसामान्यांच्या अडचणींची दखल घेण्यासाठी एखादी दुर्घटना घडण्याचीच प्रतीक्षा केली जात आहे?

एखाद्या निष्काळजीपणामुळे वाहनांचा अपघात झाला, एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेला किंवा निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? ठेकेदार कंपनी आणि संबंधित महामार्ग अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई होणार का? आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सोनवी पुलासह आरवली ते बावनदी दरम्यानच्या सर्व धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून सुरक्षित डायव्हर्जन, पुरेसे दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था आणि अपूर्ण जोडरस्त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

कारण महामार्गाचे काम रखडले म्हणून प्रवाशांचे आयुष्य रखडता कामा नये! ठेकेदाराचा वेळ आणि सोय महत्त्वाची की जनतेचा जीव? महामार्ग प्रशासनाने याचे उत्तर आता कृतीतून द्यावे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर शोक व्यक्त करणे, चौकशीचे आदेश देणे आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलणे एवढेच प्रशासनाच्या वाट्याला उरणार आहे. जनतेला आता सुरक्षित रस्ता हवा आहे; मृत्यूचा सापळा नको.

Comments are closed.