राजवाडी ब्राह्मणवाडी शाळेतील खोली धोकादायक, तीन वेळा स्मरणपत्रे देऊनही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या व नादुरुस्त इमारतीमधील धोकादायक खोली तातडीने कोसळविण्याची मागणी होत आहे. या खोलीच्या पाडकामासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करून तीन वेळा स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये शिक्षकांसाठी स्टाफ रूम असून, ही इमारत नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यातील धोकादायक खोलीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर खोलीची दुरवस्था लक्षात घेऊन ती पाडण्याबाबत ग्रामपंचायतीनेही शिक्षण विभागाला पत्र देऊन मागणी केली आहे.
या धोकादायक खोलीच्या पाडकामासाठी शिक्षण विभागाकडे डिसमेन्टल प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तीन वेळा स्मरणपत्रे देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्रभाग समितीच्या बैठकीतही ही धोकादायक खोली पाडण्याबाबत चर्चा झाली होती. तरीदेखील प्रत्यक्षात पाडकाम झालेले नाही.शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष करणे गंभीर ठरू शकते. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन धोकादायक खोलीची पाहणी करावी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तिचे पाडकाम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Comments are closed.