…. त्यासाठीच अमित शहा दोन महिन्यांत सात वेळा महाराष्ट्रात – संजय राऊत
देशभरातली खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 150 कोटी रुपयांचा भाव लावण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. त्या आकड्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता मी काल केलेल्या दाव्यावर कोणी आक्षेप घेतला आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझा आकडा खरा असून अमित शहा दोन महिन्यांत सात वेळा महाराष्ट्रात आले, मणिपूरला बघा तिकडे काय चालले आहे. इतर राज्यात जा, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईतूनच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैसा जाणार असून त्यासाठीच अमित शहांच्या वारंवार मुंबई फेऱ्या सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
एसआरएचे सुमारे तीनशे प्रकल्प नियमबाह्य पद्धतीने होत असून नगरविकास खाते आणि प्रत्येकाला दिलेला कोटा यातून हा पैसा उभा केला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दीड लाख कोटी रुपयांचे टार्गेट अमित शहा यांनी दिल्याचे सांगत महाराष्ट्र कसा लुटला जात आहे ते पाहा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. डिलिमिटेशनसाठी त्याहून मोठे टार्गेट असून काही मंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली आहे, मात्र मला मुख्यमंत्री करा, अशी मागणीही त्यांनी केल्याचा खोचक टोला लगावला.
मोदी ज्ञानेश कुमारचे पंतप्रधान आहेत देशाचे नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी सोने-चांदी खरेदी करण्याचे आवाहन केल्याच्या दाव्यावरूनही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. देशाच्या पंतप्रधानांवर याक्षणी काहीही विश्वास ठेवू नका, ते काहीही बोलत आहेत, असे ते म्हणाले. ज्यावेळी कोणाच्याही पंतप्रधानपदाला अखेरची घरघर लागते तेव्हा अशी वक्तव्ये होत असतात, असे सांगत देशाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही सांगितले म्हणून लोकांनी सोने घ्यायचे थांबवले नाही आणि तुम्ही सांगितले म्हणून लोक सोने घेणार नाहीत, असे ते म्हणाले. गरिबांनाच सोने-चांदी खरेदी करू नका असे का सांगता, असा सवाल करत गौतम अदानी आणि अंबानींनी विमानतळे, बंदरे, जमिनी, धारावी आणि एसआरए प्रकल्प घ्यायचे आणि त्यांना रोखायचे नाही का, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. दुष्काळाच्या काळात माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपवास करायचे, एकवेळ जेवायचे आणि परदेश दौरे टाळायचे; मोदी तसे करणार आहेत का, असा सवाल करत काहीही तोंडाला येईल ते बडबडायचे आणि आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणायचे, हे ज्ञानेश कुमारचे पंतप्रधान आहेत देशाचे नाहीत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
Comments are closed.