महाराष्ट्रामध्ये दुष्काळाशी लढण्यासाठी पैसे नाहीत मात्र खासदारांना 150 कोटीची ऑफर, संजय राऊत यांचा घणाघात
डीलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाशी लढण्यासाठी निधी उपलब्ध नाही, मात्र डीलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी खासदारांना 150-150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर लहान पक्षांनाही वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात असून पक्ष फुटत नसतील तर त्या पक्षातील खासदारांनाच फुटण्यासाठी थेट आमिषे दाखवली जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन अद्याप न घेतले जाणे हे पूर्णपणे नियमबाह्य आणि संविधानाच्या विरोधात असल्याचे संजय राऊत म्हणाले. अधिवेशन गुंडाळण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांना केवळ अहंकारामुळेच होत आहे; कारण अधिवेशन घेतल्यास डीलिमिटेशनचे विधेयक आणून ते कोणत्याही किंमतीत मंजूर करायचे, त्यासाठी खासदार विकत घ्यायचे, पक्ष फोडायचे किंवा संसद बंद पाडायची अशी त्यांची रणनीती असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. पुढे ते म्हणाले, द्रमुक, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कम्युनिस्ट पार्टी तसेच इतर लहान पक्षांवर दबाव आणि फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचे सांगत संजय राऊत यांनी, आमच्यावरही असेच प्रयोग झाले आणि आमचेही सहा आमदार फोडण्यात आले, असे नमूद केले. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अमित शहा किंवा भाजपकडून नेमलेल्या एजंटांमार्फत डीलिमिटेशनच्या बाजूने मतदान करण्यासाठी खासदारांचा 150 कोटींचा भाव सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे वास्तव असून कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या, असेही संजय राऊत ठणकावून म्हणाले.
संजय राऊत यांनी ही राजकीय संस्कृती कोणी आणली, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील आमदारांच्या फोडाफोडीचा दाखला दिला. महाराष्ट्रातील आमदार काही चिंचोके देऊन किंवा खणानारळाने ओटी भरून फुटले नाहीत, तर त्यांनाही 50-50 आणि 100-100 कोटी रुपये देऊनच फोडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. 2029 च्या दृष्टीने हे विधेयक भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे अत्यंत महत्त्वाचे विधेयक असल्याने 150 कोटी घेऊन बाजूने मतदान करण्याची सर्वपक्षीय ऑफर दिली जात असल्याचे संजय राऊत म्हणाले. विविध पक्षांतील खासदारांना वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून पक्षाचा व्हीप झुगारल्यास खासदारकी वाचवण्याचे आश्वासन देणारी यंत्रणा उभी करण्यात आल्याचे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात दुष्काळाशी सामना करण्यासाठी पैसे नसताना खासदारांच्या खरेदीसाठी 150-150 कोटींची बोली लावली जात आहे. लहान पक्षांनाही छोटे प्रस्ताव दिले जात असून पक्ष फुटत नसेल तर त्यातील खासदारांनाच फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संताप खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Comments are closed.