भाईंदरमध्ये चर्मकारांचे चूल-मूल धरणे आंदोलन, गटई स्टॉलधारकांवरील जाचक अटी रद्द करण्याची मागणी
मीरा-भाईंदर महापालिकेच्या १३ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत गटई चर्मकार स्टॉल धारकांच्या विरोधात जाचक नियम लावणारा ठराव मंजूर केला आहे. या अन्यायकारक ठरावाविरोधात चर्मकार समाज आक्रमक झाला आहे. जाचक नियम व अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने भाईंदरमध्ये चूल व मूल धरणे आंदोलन सुरू केले आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात हे आंदोलन सुरू आहे.
उद्ध्वस्त करू नका
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मीरा-भाईंदर शहराच्या महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. चर्मकार बांधवांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मीरा-भाईंदरच्या महापौरांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अश्रुबा माने, गोरखनाथ ठोंबरे, काशिनाथ सौंदडे, मुक्ताराम घायाळ आदी उपस्थित होते.
मीरा-भाईंदर शहरातील अनुसूचित जातीतील शेकडो गटई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून चप्पल व बूट दुरुस्तीचा पारंपरिक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र पालिकेने १३ ऑगस्टच्या महासभेत जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती, दोन स्टॉलमधील किमान अंतर ५०० मीटर, स्टॉलचे क्षेत्रफळ, उत्पन्न मर्यादा, परवाना हस्तांतरण व नूतनीकरण याबाबत अनेक अटी, शर्थी लावणारा ठराव मंजूर केला. त्यामुळे गटई कामगार आणि दिव्यांग परवानाधारकांच्या रोजगारावर संकट ओढवले आहे. हा ठराव मागे घ्यावा, अशी मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने चर्मकार संघटनेने आपल्या कुटुंबांसह चूल व मूल आंदोलन सुरू केले आहे.
Comments are closed.