म्हसळ्याच्या १३ गावांतील ग्रामस्थ नेटवर्कसाठी मोबाईल घेऊन डोंगरावर, विद्यार्थ्यांची पंचाईत, शाळा-अंगणवाडी, ग्रामपंचायतींची ऑनलाइन कामे लटकली
■ शशिकांत शिर्के
म्हसळा, दि. २१ – सगळे जग ऑनलाइन झाले असतानाच रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील घुमगाव आणि पंचक्रोशीतील गावे मात्र बाबा आदमच्या जमान्यातच राहत आहेत. घुम, रुद्रवट, कोकबल, ठाकरोली, सांगवड, कृष्णनगर, कोलवट, भापट, रातिवणे, ताम्हणे, करंबे, नेवरुळ, सकलक कोंड या १३हून अधिक गावांत मोबाईलचे नेटवर्कच येत नसल्याने नेटवर्क शोधण्यासाठी मुलांसह गावकरी झाडांवर चढून आणि डोंगरांवर जाऊन सिग्नल मिळविण्यासाठी आटापिटा करीत आहेत. मोबाईलला नेटवर्कच नसल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासाची प्रचंड पंचाईत होत असून शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतींची ऑनलाइन कामे लटकून पडत आहेत.
म्हसळा तालुक्यातील घुमगावासह पंचक्रोशीतील पंधरा गावांमध्ये दीड हजारहून अधिक कुटुंबे राहतात. परंतु या गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्कच येत नसल्याने गावकऱ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे. गावातील तरुण वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करणे, ऑनलाइन परीक्षा देणे, ऑनलाइन अभ्यास करणे, शासकीय योजनांची माहिती घेणे ही सर्व कामे त्यांना मोबाईलवरच करावी लागतात. परंतु नेटवर्क नसल्याने तरुणांना गाव सोडून तालुक्याच्या किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन ही कामे करावी लागत असल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची प्रतिक्रिया घुम रुद्रवटचे सरपंच श्रीकांत बिरवाडकर यांनी दिली.
गावात नेटवर्कच नसल्याने गावाबाहेर डोंगरांवर उंच ठिकाणी रेंज शोधत फिरावे लागते. उंचावर गेल्यानंतरच कसाबसा सिग्नल मिळत असल्याने तेथे थांबूनच त्यांना मोबाईलवर बोलणे करावे लागत असल्याची माहिती सुधीर रातवडकर या गावकऱ्याने दिली.
■ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड, हजेरी, अंगणवाडीचे अहवाल, ग्रामपंचायतीचे ऑनलाइन कामकाज, दाखले, शासकीय योजनांचे फॉर्म ही सर्व कामे मोबाईल नेटवर्क नसल्याने अडत आहेत. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, आशासेविका, बचत गटाच्या महिला, तलाठी या सर्वांना काम करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
■ नेटवर्क नसल्याने बँकेची कामे, पैसे भरणे, मोबाईल रिचार्ज, ऑनलाइन पेमेंट, दाखले काढणे ही सर्व कामे म्हसळा किंवा इतर ठिकाणी जाऊन करावी लागतात.
■ सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोग्याची. एखाद्याला अचानक आजारपण आले, अपघात झाला, प्रसूतीची वेळ आली तर डॉक्टरांना, रुग्णवाहिकेला फोन करण्यासाठीदेखील नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे जीव धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Comments are closed.