मीरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार कूल कूलपरिवहन ताफ्यात ४२ एसी बसेस दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला केंद्र सरकारने १०५ इलेक्ट्रिक एसी बसेस मंजूर केल्या आहेत. पैकी ४२ बसेस परिवहन ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदरकरांचा प्रवास कूल कूल होणार आहे. पालिकेला मोठ्या संख्येने बसेस मिळणार असल्याने मीरा-भाईंदर शहरातील सर्व प्रभाग क्षेत्रांत तसेच आजूबाजूच्या शहरांत पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ३८ शहरांना एकूण ३,३३२ ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत महाराष्ट्राला १,३४० ई-बसेस मिळणार आहेत. या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर शहरासाठी १०५ ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६३ मोठ्या बस आणि ४२ मिडी बसचा समावेश आहे. पैकी ४२ मिडी ई-बसेस महापालिकेला प्राप्त झाल्या असून सध्या त्यांची आरटीओ नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

देखभालीची जबाबदारी ठेकेदारावर

सर्व बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेनुसार बसमधून मिळणारे तिकीट उत्पन्न महापालिकेला प्राप्त होणार आहे. तर बस संचालन, चालक व तंत्रज्ञांचे वेतन, इंधन आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असेल. या सेवेसाठी ठेकेदाराला केंद्र सरकारकडून प्रतिकिलोमीटर अनुदान दिले जाणार आहे. मोठ्या बससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये तर मिडी बससाठी २२ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

Comments are closed.