दुष्काळात तेरावा महिना… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 22 हजार नागरिकांचे रेशनपाणी बंद
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विभागावर भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शासन – प्रशासनाचा तुघलकी कारभार समोर आला आहे. जिल्ह्यातील १ लाख २२ हजार रेशनकार्डधारकांचे वेगवेगळी कारणे पुढे करत रेशनपाणी बंद केले आहे. लाडकी बहीण योजनेला कात्री लावल्यानंतर आता रेशन बंद करण्याचे काम शासन करत आहे.
केंद्र शासनाने मिशन सुधार अंतर्गत रेशनवर धान्य उचलणाऱ्या कुटुंबांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात प्रामुख्याने आयटीआर, टॅन, ई-केवायसी आणि चारचाकी वाहन असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना धान्य योजनेतून वगळण्यात येत आहे. मागील वर्षभरात या मोहिमेत १ लाख ६५ हजार ९५३ रेशन कार्ड संशयित आढळले असून त्यापैकी १ लाख २२ हजार ५१८ कार्डधारकांचे रेशन धान्य बंद करण्यात आले आहे.
शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी मिशन सुधार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत एका कुटुंबाची एकापेक्षा जास्त रेशनकार्डे असणे, कायमस्वरूपी स्थलांतर झाल्यानंतरही नोंद कायम असणे, आधार, ई-केवायसी आणि लाभार्थी माहितीमध्ये विसंगती आढळणे, उत्पन्न जास्त असतानाही कमी दाखविणे, घरी चारचाकी वाहन असणे, आयटी रिटर्न भरणारे, स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या जिल्ह्यात १ लाख २२ हजार नागरिकांचे रेशनपाणी बंद योजनेतून वगळण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
या मोहिमेला जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख रेशनकार्ड असून, त्यापैकी ५ लाख ५२ हजार रेशनकार्डावर धान्य योजना लागू आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५९ हजार ९१५ रेशनकार्डे विविध कारणाने अपात्र ठरविण्यात आली आहेत. त्यांना एनपीएच (नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड) म्हणजे प्राधान्य गटात न येणारे कुटुंब या प्रकारात धान्याचा लाभ बंद केला जातो. मागील वर्षभरात या मोहिमेत आतापर्यंत १ लाख ६५ हजार ९५३ संशयित कार्डपैकी १ लाख २२ हजार ५१८ कार्ड एनपीएचमध्ये समाविष्ट करुन त्यांचे धान्य बंद केले आहे.

४३ हजार कार्ड शिल्लक
शासन आदेशानुसार सध्या मिशन सुधार मोहिमेत सखोल तपासणी केली जात आहे. यात १ लाख ६५ हजार ९५३ संशयित सदस्यांपैकी १ लाख २२ हजार ५१८ सदस्यांची नावे वगळली आहेत. उर्वरित ४३ हजार ४३५ सदस्यांची तपासणी सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
Comments are closed.