‘मी मुंबईत मोठा पोलीस अधिकारी आहे’ म्हणत दादागिरी, पोलीस निरीक्षकाची मिस्त्री कामगाराला बेदम मारहाण

​मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने निलंगा तालुक्यातील तळखेड येथील मिस्त्री कामगाराच्या दुचाकीला कारने धडक देऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलंगा शहराबाहेरील उदगीर मोडवर शुक्रवारी (दि. २१) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. “मी मुंबईत मोठा पोलीस अधिकारी आहे,” अशी दादागिरी करत या अधिकाऱ्याने दापका येथील काही तरुणांना बोलावून पीडित कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​तळखेड (ता. निलंगा) येथील मिस्त्री कामगार दयानंद आप्पाराव चपटे हे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. २५ एक्स ४१३३) गावाकडे जात होते. निलंगा शहराबाहेरील उदगीर मोडवर औराद शहाजानीच्या दिशेने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

च्याजातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

अपघातानंतर कारचालक असलेले मुंबईतील पोलीस निरीक्षक भगवान भरत नाईकवाडे (रा. दापका, हल्ली मुक्काम मुंबई) यांनी कार थांबवून चपटे यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. दापका येथून काही ओळखीच्या तरुणांना बोलावून घेत त्यांनी चपटे यांना पुन्हा मारहाण केली. “मी मुंबईला मोठा अधिकारी आहे,” असे सांगत त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पीडित चपटे यांनी आपली जात सांगितल्यानंतर नाईकवाडे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत पाठीवर, पायावर आणि डोक्यावर मारहाण करून जखमी केले. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न करूनही मारहाण सुरूच होती. “मी पोलीस खात्यात अधिकारी आहे, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकीही त्यांनी दिल्याचे चपटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

च्यापरस्परविरोधी तक्रारी आणि गंभीर आरोप

दुसरीकडे, या घटनेत पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडे यांच्याही पाठीवर मार लागला असून त्यांना टाके पडले आहेत. त्यांच्यावर सध्या लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलंगा पोलिसांनी घटनास्थळाचा आणि लातूर येथे जाऊन जखमी नाईकवाडे यांचा जबाब व पंचनामा नोंदवला आहे. नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून दयानंद चपटे यांच्यासह इतरांविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, “मला मारण्यासाठी स्थानिक पोलिसांनीच सुपारी घेतली आहे,” असा खळबळजनक आरोप करत नाईकवाडे यांनी काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नावे आरोपींच्या यादीत समाविष्ट केली आहेत.

च्यावादग्रस्त कार्यपद्धतीची चर्चा

संबंधित पोलीस निरीक्षक हे नेहमीच वादग्रस्त राहिले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे आणि अरेरावी करणे हे त्यांचे नित्याचेच असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. लातूर येथे पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांनी “मी पोलीस अधिकारी आहे, तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी दिल्याचे समजते.

​शनिवारी (दि. २२) या प्रकरणाचा पंचनामा पूर्ण करून परस्परांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.